Headlines

तंजावरमध्ये दक्षिण भारतातील पहिले मराठी साहित्य संमेलन:23 रोजी; सरफोजीराजे (द्वितीय) साहित्य संमेलनात देशभरातील साहित्यिकांचा सहभाग




तामिळनाडूतील तंजावर येथे दक्षिण भारतातील पहिले मराठी साहित्य संमेलन बुधवार, २३ ऑगस्ट रोजी होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेने ‘सरफोजीराजे (द्वितीय) मराठी साहित्य संमेलन’ आयोजित केले आहे. या संमेलनात देशभरातील साहित्यिक, कवी आणि साहित्यप्रेमी सहभागी होणार आहेत. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरद गोरे संमेलनाध्यक्ष म्हणून काम पाहतील. या संमेलनातून मराठी आणि तमिळ भाषेतील साहित्य, कला व संस्कृतीचा संवाद साधण्याचा प्रयत्न केला जाईल. तंजावरच्या भूमीला मराठी संस्कृतीचा समृद्ध इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजे भोसले यांनी तंजावरमध्ये मराठा साम्राज्याची स्थापना केली होती. त्यानंतर सरफोजीराजे (द्वितीय) यांनी तंजावरला दक्षिणेतील मराठी संस्कृतीचे महत्त्वाचे केंद्र बनवले. त्यांच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक योगदानाच्या स्मरणार्थ या संमेलनाला त्यांचे नाव देण्यात आले आहे. संमेलनाची सुरुवात दुपारी ३.३० वाजता ग्रंथदिंडीने होईल. त्यानंतर दुपारी ४ वाजता बृहदेश्वर मंदिराजवळील पेथनन कलैयरंगम सभागृहात उद्घाटन सोहळा होईल. तंजावर संस्थानचे प्रमुख श्रीमंत छत्रपती बाबाजीराजे भोसले यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन केले जाईल. यावेळी स्वागताध्यक्ष प्रा. डॉ. लक्ष्मणराव ढोबळे आणि निमंत्रक युवराज संभाजीराजे भोसले यांच्यासह साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहतील. सायंकाळी परिसंवाद आणि त्यानंतर कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. ज्येष्ठ कवी सूर्यकांत नामुगडे यांच्या ‘सावल्या’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशनही यावेळी होईल. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, दिल्ली आणि इतर भागांतील साहित्यिक यात सहभागी होतील. दरम्यान, २१ ऑगस्ट रोजी ‘पंढरीची वारी, साहित्य संमेलनाच्या दारी’ या उपक्रमांतर्गत पंढरपूर ते सोलापूर ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. सोलापूरहून ही दिंडी रेल्वेद्वारे तंजावरकडे रवाना होईल. या धावत्या रेल्वेत ‘प्रवासी साहित्ययात्री संमेलन’ देखील होणार आहे. यात विद्यार्थ्यांच्या कवितांचे वाचन केले जाईल. रात्री समारोप आणि पुरस्कार वितरण सोहळा होईल. साहित्य, कला, समाजसेवा, शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवरांना ‘सरफोजीराजे’ पुरस्कार देऊन गौरवण्यात येईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *