![]()
३८व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये दिमाखदार केरळ महोत्सव उत्साहात पार पडला. श्री गणेश कला क्रीडा रंगमंच प्रवेशद्वार केळीचे खुंट, नारळाच्या झावळ्या, तोरण आणि फुलांच्या रांगोळीने सजवले होते. पारंपारिक पंचवाद्यांचा गजर, गणेश वंदना, भरतनाट्यम, शास्त्रीय आणि अर्ध-शास्त्रीय नृत्य, गाणी, तिरुवथिरकली लोकनृत्य, मोहिनीअट्टम अशा विविध नृत्य प्रकारांद्वारे मल्याळी संस्कृतीचे सुंदर दर्शन घडवण्यात आले. पुणे शहर आणि जिल्ह्यातील केरळवासीयांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही रविवारी हा महोत्सव साजरा झाला. या कार्यक्रमाला पुण्यातील केरळवासीयांनी मोठी गर्दी केली होती. या महोत्सवाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. पुणे मल्याळी फेडरेशनचे अध्यक्ष राजन नायर, पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक ॲड. अभय छाजेड, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, सांस्कृतिक कार्यक्रम मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई, विश्वस्त मोहन टिल्लू, काका धर्मावत, समन्वयक बाबू नायर, पुणे मल्याळी फेडरेशनचे उपाध्यक्ष एम.व्ही. परमेश्वरम, सरचिटणीस टी.डी. जॉन, सांस्कृतिक प्रमुख नारायण पोदुवाल, खजिनदार आर. नायर आणि पुणे केरळी समाज अध्यक्ष मधु नायर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी पुण्यातील ३५ मल्याळी संघटनांचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्राची तुतारी आणि केरळचे चेंडमेलम यांच्या निनादाने सभागृह भरून गेले होते. समन्वयक बाबू नायर यांनी प्रास्ताविक केले. पुणे फेस्टिव्हलचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी पुणे फेस्टिव्हलमध्ये केरळ महोत्सव सातत्याने आयोजित करून राष्ट्रीय एकात्मता साधली, असे अध्यक्ष राजन नायर यांनी सांगितले. पुणे जिल्ह्यातील केरळवासीयांच्या मुला-मुलींनी केरळच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे बहारदार नृत्याविष्कार सादर केले. यामध्ये ओप्पाना (मुस्लिम एथनिक नृत्य) आणि मोर्गमकली (ख्रिश्चन एथनिक नृत्य) हे नृत्याविष्कार सादर करून केरळ संस्कृतीतील धार्मिक एकोप्याचे सुंदर दर्शन घडवले. ड्रग्ज विरोधी संदेश देणाऱ्या नृत्याविष्कारालाही प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला. पुणे जिल्ह्यात सुमारे ४.५ लाख केरळवासीय राहतात. त्यांच्या ३५ संस्थांच्या पुणे मल्याळी फेडरेशनचे चेअरमन राजन नायर आणि को-ऑर्डिनेटर बाबू नायर यांनी या महोत्सवाचे आयोजन केले. यामध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन अशा सर्व धर्मियांचा एकोपा दाखवणाऱ्या नृत्याविष्कारांनी प्रेक्षकांना विशेष आनंद दिला. या सर्व कार्यक्रमांमध्ये पुणे जिल्ह्यातील २०० हून अधिक केरळी युवक आणि युवती कलावंत सहभागी झाले होते. महाराष्ट्र ही कर्मभूमी आणि केरळ ही मातृभूमी यांच्यात बंधुभाव वाढावा, असा प्रयत्न यातून केला गेला आहे, असे पुणे मल्याळी फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजन नायर यांनी सांगितले.
Source link
पुणे फेस्टिव्हलमध्ये मल्याळी संस्कृतीचे दर्शन घडवणारा केरळ महोत्सव:38व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये विविध नृत्य प्रकारांद्वारे धार्मिक एकोपाही दिसला