![]()
बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून झोपडपट्टी परिसरातील अनधिकृत बांधकामांविरोधात विशेष मोहीम दिनांक 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2026 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. या अंतर्गत 14 फुट आणि त्यापेक्षा अधिक उंचीच्या झोपड्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर झोपडपट्टी क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे तिथे वास्तव्यास असलेल्या संबंधित रहिवाशांनी स्वतःहून तात्काळ निष्कासित करावीत, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या निर्देशांनुसार आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत बांधकामांविरोधात विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. सह आयुक्त (दक्षता) देवेंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली राबवल्या जाणाऱ्या या मोहिमेचा मुख्य उद्देश झोपडपट्टी परिसरातील अनधिकृत आणि नियमबाह्य बांधकामांचे निष्कासन करणे हा आहे. 14 फुटांहून अधिक उंचीच्या झोपड्यांची आकडेवारी बृहन्मुंबई क्षेत्रात (शहर आणि उपनगरे) एकूण 2 लाख 23 हजार 150 झोपड्या आहेत. यापैकी तब्बल 39 हजार 111 झोपड्या 14 फूट आणि त्याहून अधिक उंचीच्या असल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये शहर विभागात 3 हजार 348, पश्चिम उपनगरात 4 हजार 536 तर पूर्व उपनगरांमध्ये सर्वाधिक 31 हजार 227 झोपड्यांचा समावेश आहे. यापैकी 4 हजार 584 झोपड्यांवर यापूर्वीच निष्कासनाची कारवाई करण्यात आली असून 611 झोपड्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. उर्वरित रहिवाशांनी आपली अनधिकृत बांधकामे स्वतःहून न हटवल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. पालिकेची सातत्यपूर्ण कारवाई आणि आवाहन महानगरपालिकेच्या विविध प्रशासकीय विभागांकडून (वॉर्ड) अनधिकृत बांधकामांवर सातत्याने हातोडा चालवला जात आहे. 24 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2026 या कालावधीत पालिकेने एकूण 128 अनधिकृत बांधकामांवर कारवाई पूर्ण केली असून, आणखी 140 बांधकामांवर कारवाई प्रस्तावित आहे. नागरिकांनी नवीन अनधिकृत बांधकामे करू नयेत आणि यापूर्वी केलेली असल्यास ती स्वतःहून तत्काळ हटवावीत, अन्यथा प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जाईल, असे आवाहन पालिकेने केले आहे. नागरिकांचा संभाव्य विरोध आणि तणाव अलीकडच्या काळात मुंबईतील अनेक झोपडपट्ट्यांमध्ये 14 फुटांची मर्यादा ओलांडून थेट तीन मजली घरे बांधण्यात आली आहेत. महानगरपालिकेने आता या नियमबाह्य उंच बांधकामांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे झोपडपट्टीतील नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची चिन्हे आहेत. अनेकांची घरे कारवाईच्या कक्षेत येत असल्याने, पालिकेच्या या धडक मोहिमेला स्थानिक रहिवाशांकडून मोठ्या प्रमाणावर विरोध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Source link
मुंबईत 14 फुटांहून अधिक उंचीच्या झोपड्यांवर कारवाईचा बडगा:पालिकेची विशेष मोहीम, 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबरदरम्यान धडक कारवाई