![]()
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातील संशोधकांनी विकसित केलेल्या पर्यावरणपूरक रासायनिक प्रक्रियेला भारतीय पेटंट मंजूर झाले आहे. आयोनिक लिक्विड्सचा वापर करून विद्रावकरहित परिस्थितीत अरीलीडीन-ऑक्सिइंडोल संयुगांची निर्मिती करण्याच्या प्रक्रियेसाठी हे पेटंट देण्यात आले आहे. या संशोधनातून भविष्यात क्षयरोगावरील प्रभावी औषधांच्या विकासासाठी नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. हे संशोधन रसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. बापू शिंगटे यांच्या नेतृत्वाखाली झाले. डॉ. ज्ञानेश्वर सुभेदार, डॉ. मुबारक शेख, डॉ. अमोल नागरगोजे आणि डॉ. सतीश अकोलकर यांचा संशोधनात सहभाग आहे. संशोधकांनी विकसित केलेली प्रक्रिया हरित रसायनशास्त्राच्या संकल्पनेवर आधारित आहे. पारंपरिक सेंद्रिय विद्रावकांचा वापर टाळून आयोनिक लिक्विड्सच्या सहाय्याने रासायनिक अभिक्रिया अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पद्धतीने करता येतात. त्यामुळे रासायनिक कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यास तसेच शाश्वत तंत्रज्ञानाच्या विकासाला चालना मिळण्याची शक्यता आहे. अरीलीडीन-ऑक्सिइंडोल संयुगे जैविकदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानली जातात. संशोधकांच्या प्राथमिक अभ्यासानुसार, या संयुगांमध्ये क्षयविरोधी गुणधर्म विकसित करण्याची क्षमता असू शकते. त्यामुळे भविष्यात क्षयरोगावरील औषध संशोधनात ही संयुगे संभाव्य ‘लीड मॉलिक्यूल्स’ म्हणून उपयुक्त ठरू शकतात. मात्र, औषध म्हणून त्यांचा उपयोग निश्चित करण्यासाठी पुढील जैविक व औषधवैज्ञानिक अभ्यास आवश्यक आहे. एक्स्पर्ट व्हियू डॉ. बापू शिंगटे म्हणाले, “मूलभूत संशोधनाचे बौद्धिक संपदेमध्ये रूपांतर होणे ही विद्यापीठासाठी अभिमानाची बाब आहे. पर्यावरणपूरक रासायनिक प्रक्रिया आणि आरोग्य क्षेत्रातील संभाव्य उपयोग या दोन्ही दृष्टीने या संशोधनाचे महत्त्व आहे. संशोधनाची वैशिष्ट्ये: – आयोनिक लिक्विड्सचा वापर
– पारंपरिक सेंद्रिय विद्रावकांना पर्याय
– विद्रावकरहित रासायनिक प्रक्रिया
– रासायनिक कचरा कमी करण्याची शक्यता
– टीबीवरील औषध संशोधनासाठी संभाव्य उपयोग
Source link
विद्रावकरहित हरित रासायनिक प्रक्रियेला भारतीय पेटंट:'बामू'च्या रसायनशास्त्र विभागातील संशोधकांचे संशोधन; TB वरील औषधनिर्मितीसाठी ‘लीड मॉलिक्यूल्स’ची शक्यता