![]()
प्रभाकर फाउंडेशनतर्फे संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांना पहिल्या संगीतकार यशवंत देव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते रविवारी (२० तारखेला) यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हा गौरव सोहळा पार पडला. यावेळी बोलताना प्रकाश जावडेकर म्हणाले, संगीत ही एक आराधना आहे. ती आत्म्याशी संवाद साधणारी कला असून जीवनातील एक अखंड काव्य आहे. ज्याला तानसेन होता आले नाही, त्याला निदान कानसेन होता आले पाहिजे. प्रत्येकाने संगीताची आराधना करावी असे आवाहन त्यांनी केले. डॉ. सलील कुलकर्णी यांचे सांगितीक क्षेत्रातील कार्य मोलाचे असून त्यांच्या सर्जनशीलतेत भावपूर्णता आढळते, असे गौरवोद्गारही जावडेकर यांनी काढले. संगीतकार यशवंत देव यांच्या जन्मशताब्दीनिमित्त हा पुरस्कार देण्यात आला. पुणेरी पगडी, शाल आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. कार्यक्रमाला प्रभाकर फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डॉ. अनिल कुलकर्णी, निमंत्रक नगरसेविका ज्योत्स्ना जगन्नाथ कुलकर्णी, आमदार सुनील कर्जतकर, उद्योजक प्रविण बढेकर, संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, निकिता मोघे, अजित कुलकर्णी आणि जगन्नाथ कुलकर्णी उपस्थित होते. याप्रसंगी प्रभाकर फाउंडेशनच्या कार्याचा शुभारंभ आणि बोधचिन्हाचे अनावरणही मान्यवरांच्या हस्ते झाले. सत्काराला उत्तर देताना डॉ. सलील कुलकर्णी म्हणाले, महान संगीतकाराच्या नावाचा पुरस्कार मिळणे म्हणजे एक सुंदर सांगितीक वारसा पुढे जात असल्याचे वाटते. यशवंत देव हे उत्कृष्ट संगीतकार, कवीच नव्हते तर ते एक उत्तम संवादकही होते. त्यांच्या भेटीदरम्यान ‘देव तुझ्या पाठीशी आहेत’ असा आशीर्वाद त्यांनी दिला होता, हे आजही मला आठवते. सांगितीक क्षेत्रात थोर कलाकारांच्या आठवणींसह वाटचाल सुरू आहे. अशा प्रकारचे पुरस्कार पुन्हा एकदा नवी उमेद देतात. प्रास्ताविकात प्रा. डॉ. अनिल कुलकर्णी यांनी प्रतिष्ठानच्या स्थापनेविषयी माहिती दिली. प्रभाकर फाउंडेशनाच्या माध्यमातून अनेक कलाकारांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांचे कार्य समाजासमोर आणले जाईल, असे त्यांनी सांगितले. पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त संगीतकार यशवंत देव यांच्या गीतांवर आधारित ‘देवगाणी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जितेंद्र अभ्यंकर आणि रश्मी मोघे यांनी यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेली गीते सादर केली. केदार परांजपे, डॉ. राजेंद्र दूरकर, राजेंद्र साळुंखे, समीर बंकापुरे आणि नरेंद्र चिपळूणकर यांनी त्यांना साथसंगत केली. स्नेहल दामले यांनी निवेदन केले, तर केतकी महाजन-बोरकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
Source link
डॉ. सलील कुलकर्णी यांना पहिल्या संगीतकार यशवंत देव पुरस्काराने गौरव:प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते प्रभाकर फाउंडेशनतर्फे सन्मान, 'संगीत ही आराधना' जावडेकरांचे प्रतिपादन