![]()
खेळ हा आपल्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा घटक असून खेळ आणि त्यातील चिकाटीमुळे आपल्या भविष्याला योग्य ती दिशा मिळण्यास मोठी मदत होते, असे प्रतिपादन गंगापूरच्या उपविभागीय पोलिस अधिकारी जान्हवी शेखर यांनी केले.
.
गंगापूर येथील न्यू हायस्कूल व श्री मुक्तानंद महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने, क्रीडा व युवक सेवा संचालनालय (पुणे), जिल्हा क्रीडा परिषद तथा जिल्हा क्रीडा कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने आयोजित १४, १७ आणि १९ वर्षांखालील मुला-मुलींच्या जिल्हास्तरीय शालेय हँडबॉल स्पर्धा मुक्तानंद महाविद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडल्या.
या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून जान्हवी शेखर बोलत होत्या. त्या म्हणाल्या, खेळाच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडते आणि खेळाडूवृत्तीमुळे आयुष्याची यशस्वी वाटचाल करणे सोपे जाते. या स्पर्धेसाठी राज्यभरातून व जिल्हाभरातून ३० पेक्षा अधिक संघांनी सहभाग नोंदवला होता. कार्यक्रमासाठी स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानचे सचिव तथा जिल्हा हॅण्डबॉल व व्हॉलीबॉल संघटनेचे डॉ. आबासाहेब शिरसाठ, तालुका क्रीडा अधिकारी रेखा परदेशी, रमेश सोनवणे, प्रा. फेरोज सय्यद, तालुका समन्वयक निलेश माने, छावा संघटनेचे उद्धव काळे, जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेचे प्रा. उदय तगरे, अमिन पटेल, रामदास सारसर आणि प्रमोद महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्रवीण पुलाटे, अंबादास उंडरे, महमूद पठाण, अब्दुल बागेस, अली बकोदा, प्रवीण बर्फे, मुकतार शेख आदींनी परिश्रम घेतले.