![]()
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारण, समाजकारण आणि व्यवसायातील यशामागे पत्नीची भूमिका किती महत्त्वाची असते, हे एका किस्स्यातून सांगितले. त्यांच्या या मिश्कील किस्स्याने कार्यक्रमात चांगलाच हशा पिकला. गडकरी म्हणाले, “बायको ठीक नसेल तर माणूस कितीही कर्तृत्ववान असला, तरी तो राजकारणात, समाजकारणात किंवा व्यवसायात यशस्वी होऊ शकत नाही.” गडकरींनी लग्नानंतरचा एक अनुभव सांगितला. ते म्हणाले, लग्नानंतर त्यांच्या घरी कार्यकर्त्यांची सतत वर्दळ असायची. घरात कार्यकर्ते येत असल्याने चहा-पाण्याची मोठी लगबग असे. एका दिवसात शंभर-दीडशे कप चहा बनवावा लागत होता. या सततच्या पाहुणचारामुळे एकदा त्यांच्या पत्नीने थेट सवाल केला, “मला बायको म्हणून आणले की मोलकरीण म्हणून?” गडकरींनी सार्वजनिक जीवनातील व्यक्तीच्या कुटुंबाची भूमिका स्पष्ट केली. राजकारणात किंवा समाजकारणात काम करणाऱ्या व्यक्तीला बाहेरच्या जगासाठी वेळ देता येतो, कारण घरातील अनेक जबाबदाऱ्या पत्नी सांभाळते. मुलांचे संगोपन, संस्कार आणि कुटुंबाची घडी सांभाळण्यात तिचे मोठे योगदान असते, असे त्यांनी नमूद केले. “एखाद्या पुरुषाच्या यशामागे स्त्रीचे कर्तृत्व असते,” असे गडकरी म्हणाले. त्यांनी आपल्या अनुभवातून जोडीदाराच्या योगदानाकडे लक्ष वेधले. राजकारणातील भाषणांमध्ये विकासकामे आणि धोरणांवर बोलणाऱ्या गडकरींच्या या घरगुती किस्स्याने कार्यक्रमाचे वातावरण हलके झाले. त्यांचा हा किस्सा उपस्थितांमध्ये चर्चेचा विषय ठरला.
Source link
नितीन गडकरींनी सांगितला पत्नीच्या प्रश्नाचा किस्सा:‘मला बायको म्हणून आणले की मोलकरीण म्हणून?’; म्हणाले, यशामागे पत्नीची साथ महत्त्वाची