![]()
अमरावती शहरातील फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुख्यात गुन्हेगार श्रावण उर्फ ‘छोटा डॉन’ राजेश बनारसे (वय 19, रा. वरूण नगर, महादेव खोरी) याच्यावर पोलीस प्रशासनाने ‘एमपीडीए’ कायद्यानुसार स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. त्याला आज, सोमवार, 21 सप्टेंबर रोजी अमरावती मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आले. पोलीस सूत्रांनुसार, आरोपी श्रावण बनारसे हा 2025 पासून गुन्हेगारी करत आहे. त्याच्यावर फ्रेजरपुरा, राजापेठ, नांदगाव पेठ आणि अमरावती ग्रामीणमधील तिवसा पोलीस ठाण्यात खून, जबरी चोरी, घरफोडी, अश्लील वर्तन, दुखापत करणे, अवैध शस्त्र बाळगणे तसेच तडीपारीच्या आदेशांचे उल्लंघन करणे अशा प्रकारचे एकूण आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत. याआधी त्याच्यावर प्रतिबंधात्मक आणि तडीपारीची कारवाई करूनही तो गुन्हेगारी करतच होता. आगामी सण आणि उत्सवांच्या काळात शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र राजुलवार आणि गुन्हे शाखेच्या पथकाने (गोपनीय) प्रस्ताव तयार करून आयुक्तांकडून मंजुरी मिळवली. आज, 21 सप्टेंबर रोजी त्याला ताब्यात घेऊन अमरावती मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. अमरावती शहर पोलीस प्रशासनाने इशारा दिला आहे की, आगामी काळातही शहरातील सक्रिय आणि सराईत गुन्हेगारांवर अशाच प्रकारची कडक कारवाई सुरूच राहील.
Source link
फ्रेजरपुरा परिसरातील कुख्यात 'छोटा डॉन' वर 'एमपीडीए'ची कारवाई:खून, जबरी चोरीसह 8 गंभीर गुन्हे दाखल; अमरावती मध्यवर्ती कारागृहात रवानगी