![]()
निफाड तालुक्यातील निमगाव वाकडा येथील श्री रेणुका माता मंदिराच्या जीर्णोद्धारानिमित्त कलशारोहण तसेच जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास सोमवारपासून उत्साहात सुरुवात झाली. पहिल्या दिवशी सकाळी ९ वाजता रेणुका माता मंदिराचा कलश व जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांच्या मूर्तीची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. कलशधारी महिला, पारंपरिक वाद्यांचा गजर आणि फटाक्यांची आतषबाजी यामुळे वातावरण भक्तिमय झाले होते. श्री रेणुका माता मंदिर हे निमगाव वाकडा व परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकाराने शासनाच्या तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत निधी उपलब्ध झाला. सोमवारी (दि. २१) रात्री निवृत्ती महाराज रायते यांचे कीर्तन झाले. मंगळवारी (दि. २२) रात्री नीलेश महाराज पवार यांचे कीर्तन होणार आहे. बुधवारी (दि. २३) दुपारी ३ वाजता बाबाजींची पालखी मिरवणूक, ४ वाजता प्राणप्रतिष्ठा, पूर्णाहुती व कलशारोहण सोहळा होईल. सायंकाळी ५ वाजता महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांचे प्रवचन, त्यानंतर महाआरती व महाप्रसाद होणार आहे.
Source link
रेणुका माता मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास प्रारंभ:निमगाव वाकडात कलश व मूर्ती मिरवणुकीत भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग