Headlines

जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी गणेशोत्सवामध्ये गणेश भक्तांना साद:प्रबोधनासाठी मंडळाचा जिवंत देखावा, ” रस्ता बदलायला हवा”चा प्रभावी संदेश‎


.

शहरात गणेशोत्सव उत्साहात साजरा होत असून विविध गणेश मंडळांकडून आकर्षक सामाजिक देखावे, हलते पुतळे आणि जिवंत देखाव्यांच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले जात आहे. गणेशदर्शन व देखावे पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक शहरात येत असल्याने या माध्यमातून महत्त्वाचे सामाजिक संदेश प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचत आहेत. स्नेहालयच्या विविध प्रकल्पांतील कार्यकर्तेही महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी गणेश मंडळांसोबत समन्वयाने काम करत आहेत. यंदाच्या गणेशोत्सवात स्नेहालय संचलित उडान प्रकल्प आणि स्वामी विवेकानंद तरुण मंडळ ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने साकारण्यात आलेला ‘रस्ता बदलायला हवा : बालविवाह थांबवा – बालपण वाचवा!’ हा जिवंत देखावा शहरवासीयांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे. हा देखावा केवळ मनोरंजनाचा किंवा पाहण्याचा विषय न राहता बालविवाह थांबवण्यासाठी आपण स्वतः काय करू शकतो? हा गंभीर प्रश्न प्रत्येक नागरिकासमोर उभा करणारा एक प्रभावी समाजप्रबोधनाचा उपक्रम ठरत आहे. दरम्यान, गणेशोत्सवातील प्रचंड गर्दीमध्ये बालके हरवणे किंवा महिला व बालकांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाल्यास तात्काळ मदत मिळावी, यासाठी स्नेहालयचे प्रशिक्षित कार्यकर्ते सज्ज आहेत. गरजेनुसार स्थानिक पोलीस व चाइल्ड हेल्पलाइन १०९८ यांच्याशी समन्वय साधला जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि शिक्षा बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ नुसार मुलगी १८ वर्षांखालील आणि मुलगा २१ वर्षांखालील असल्यास तो बालविवाह ठरतो. बालविवाह लावणे, त्यास प्रोत्साहन देणे किंवा विवाह घडवून आणणे हा कायद्यानुसार अजामीनपात्र गुन्हा आहे. गुन्हा सिद्ध झाल्यास यामध्ये दोषी व्यक्तीस २ वर्षांपर्यंत सक्तमजुरी आणि १ लाख रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *