![]()
मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मोठे आवाहन करत मोडी लिपीच्या जाणकारांना साद घातली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ज्यांना मोडीलिपीचे ज्ञान आहे, अभ्यास आहे, वाचन आहे आणि नोंदी जुळवता येतात, त्या सर्वांनी येत्या पाच दिवसात छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये यावे. समाजासाठी योगदान देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे फोनची वाट न पाहता तुम्ही तात्काळ या पाच दिवसात रुग्णालयात येऊन मला भेटा. तुम्हाला कुणबी नोंदी शोधण्यासाठी सरकारच्या समितीसोबत काम करायचे आहे, असे आवाहन जरांगे यांनी केले आहे. पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे म्हणाले, मोडीलिपी अभ्यासकांनी गॅलेक्सी हॉस्पिटलला यावे. उद्यापासून रविवारपर्यंत सर्वांनी रुग्णालयात यायचे आहे. फोनची वाट पाहू नका. आम्हाला मोडीलिपीचे अभ्यासक कोण आहेत हे माहीत नाही. त्यामुळे तुम्ही 27 सप्टेंबरच्या आत रुग्णालयात येऊन भेटा. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात जिथे जिथे मोडी लिपीचे अभ्यासक असतील त्यांनी उद्या परवा, शनिवारी, रविवार या पाच सहा दिवसात येऊन मला भेटा. बुधवारपासून रविवारपर्यंत कधीही या. तुम्ही तुमचे योगदान द्या. आपल्याला आपल्या लेकरासाठी काम करायचे आहे. तुम्हाला विशेष अधिकार दिला जाईल पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, मोडी लिपीच नव्हे फारशीच्या अभ्यासकांनीही रुग्णालयात यायचे आहे. तुमच्या नशिबाने तुम्हाला सेवा करण्याची संधी आली आहे. तुम्हाला विशेष अधिकार दिला जाईल. आपल्याला जुना रेकॉर्ड शोधायचा आहे. हैद्राबाद संस्थानातील जुने बाड शोधायचे आहेत. ही सर्व लिखापढी फारसी आणि मोडीलिपीत आहेत. त्यामुळे या भाषांच्या जाणकारांनी, अभ्यासकांनी येऊन मला भेटावे. मी तुमची नावे सरकारला देणार आहे. तुम्हाला वंशावळ जुळवणे, फारशी आणि मोडीलिपीची माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे अभ्यास असणाऱ्यांनीच या. इतरांनी गर्दी करू नका. तुमचे नाव आणि पत्ता घेऊन मला लवकर सरकारला कळवता येणार आहे. ज्यांना मोडीलिपी वाचता येते त्यांनीही यावे ज्यांना मोडीलिपी वाचता येते त्यांनीही यावे. तुम्हाला हैद्राबादच्या गॅझेटपासून सर्व शोधायचे आहे. तुम्हाला रेकॉर्ड शोधण्यासाठी योगदान देता येईल. ज्या ठिकाणी व्यापार होता, जनावरांचे व्यापार होते, ते पुरावे शोधता येणार आहेत. तुरुंगात आणि रुग्णालयात जाऊनही पुरावे शोधता येईल. संभाजीनगरात पुराभिलेख विभागात जाऊन तुम्हाला पुरावे शोधता येणार आहे. पूर्वी देवीची लस दिली जायची, त्याचेही पुरावे शोधावे लागणार आहे. ब्रिटिश कालीन आणि निजामकालिन पुरावे शोधावे लागणार आहे. ग्रंथालयात जाऊनही तुम्हाला पुरावे शोधावे लागणार आहे. दिल्लीपर्यंत तुम्हाला पुरावे शोधण्यासाठी जावे लागणार असल्याचे मनोज जरांगे यांनी यावेळी म्हटले आहे.
Source link
'मोडी लिपी अभ्यासकांनो, समाजासाठी योगदान द्या':मनोज जरांगेंचे आवाहन; म्हणाले- 'फोनची वाट पाहू नका, थेट रुग्णालयात या'