![]()
हिंगोली येथील मोदकाचा गणपती म्हणून प्रसिध्द असलेल्या विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी तसेच नवसाचा मोदक घेण्यासाठी यावर्षी सुमारे 4 लाखापेक्षा अधिक भाविक येण्याचा अंदाज आहे. भाविकांच्या सोयीसाठी शहरातील वाहतूक मार्गात गुरुवारी ता. 24 दुपारी दोन वाजल्यापासून बदल करण्यात आला आहे. या संदर्भातील आदेश पोलिस अधिक्षक श्रेणिक लोढा यांनी काढले आहेत. हिंगोली शहरातील मोदकाचा गणपती म्हणून विघ्नहर्ता चिंतामणी गणपती प्रसिध्द आहे. गणपतीचे नवसाचे मोदक घेण्यासाठी तसेच दर्शनासाठी गुरुवारपासून ता. 24 गर्दी होणार आहे. अनंत चतुर्थीच्या दिवशी शुक्रवारी ता. 25 मोदक वाटप होणार आहे. नवसाचे मोदक घेण्यासाठी तसेच नवस फेडण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्रासह देशभरातील विविध राज्यातून भाविक येतात. यावर्षीही सुमारे 4 लाख भाविक गणपतीच्या दर्शनासाठी येण्याचा अंदाज असून त्यानुसार भाविकांच्या सोयीसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. यामध्ये सुमारे 50 हजार भाविक थांबू शकतील एवढ्या आकाराचा वॉटर प्रुफ मंडप उभारण्यात आला आहे. हिंगोली शहरात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच त्यांच्या मदतीसाठी पोलिस प्रशासन देखील सज्ज झाले आहे. त्यानुसार गुरुवारी ता. 24 दुपारी दोन वाजल्यापासून शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. सर्व प्रकारचे वाहतुकी करीता बंद असलेले मार्ग खालीलप्रमाणे आहेत: इंदिरा गांधी चौक ते अंबीका टॉकीज पर्यंत सर्वरोडवरील वाहने पूर्णपणे बंद, गवळीपुरा जलेश्वर मंदिर ते महात्मा गांधी चौक कडे जाणारा सर्वरोडवरील वाहने पूर्णपणे बंद, खुराणा पेट्रोलपंप चौक ते महात्मा गांधी चौक कडे जाणारा सर्वरोडवरील वाहने पूर्णपणे बंद, जुने नगर पालिका चौक ते अंबीका टॉकीज कडे जाणारा सर्वरोडवरील वाहने पूर्णपणे बंद, जुनी गोदावरी हॉटेल कॉर्नर ते महात्मा गांधी चौक सर्व वाहने पूर्णपणे बंद राहतील. वाहतुकी करीता पर्यायी मार्ग खालीलप्रमाणे आहेत जवळा पळसी रोडने येणारे वाहन खुशाल नगर, नवा मोढा, रेल्वे स्टेशन रोडने जातील व येतील. कळमनुरी तसेच औंढा(ना) कडून येणारे वाहन नांदेड नाका जिल्हा परिषद रोडने येतील व जातील. वाशिम कडून येणारे वाहन छ.शिवाजी महाराज चौक, जिल्हा परिषद रोड नांदेड नाका मार्गे येतील व जातील. वाहतुक शुक्रवारी ता. 25 रात्री बारावाजेपर्यंत वाहतुक बदल कायम राहणार असल्याचे पोलिस विभागाच्या सुत्रांनी सांगितले.
Source link
हिंगोलीच्या विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीचा उत्सव:गुरुवारपासून वाहतूक मार्गात बदल, 4 लाख भाविक येण्याचा अंदाज