![]()
हिंगोली शहरात गणेशमूर्ती विसर्जनासाठी पालिका प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून गणेश मंडळांच्या सोयीसाठी शहरात सहा ठिकाणी अमृत कलश कुंड व निर्माल्य संकलन कुंडाची उभारणी केली जाणार आहे. गणेश मंडळांनी तसेच घरगुती गणेशमूर्तीचे या ठिकाणी विसर्जन करण्याचे आवाहन पालिकेच्या मु्ख्याधिकारी प्रांजली मुंढे यांनी केले आहे. हिंगोली शहरात सुमारे 200 पेक्षा अधिक ठिकाणी गणेश मूर्तीची स्थापना झाली आहे. या शिवाय घरोघरी गणेशमूर्ती स्थापन करण्यात आले आहेत. आता गणेशमूर्ती विसर्जनाचे वेध लागले असून त्यासाठी पोलिस प्रशासन, पालिका प्रशासनाकडून जय्यत तयारी केली जात आहे. शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी स्थापन केलेल्या गणेशमूर्ती इंदिरा कारखाना कार्यालयाच्या परिसरातील विहीर, तिरुमला लॉन्स जवळील विहीर तसेच कयाधू नदीच्या पात्रात विसर्जन केले जाणार आहे. याठिकाणी गणेशभक्तींची गर्दी होऊन अनुचीत प्रकार घडू नये यासाठी विहीरीच्या परिसरात बॅरीकेटींग करण्यात आले असून ठिकठिकाणी जाळ्या बसविण्यात आहेत. या शिवाय परिसरात विद्युतीकरण करण्यात आले आहे. या शिवाय महादेव वाडी परिसरात कयाधु नदीमध्ये गणेशमूर्ती विसर्जन करतांना दुर्देवी प्रकार घडू नये यासाठी जीव रक्षकांचे दोन पथक तैनात करण्यात आले आहेत. या शिवाय लहान गणेश मंडळांच्या गणेशमूर्ती तसेच घरगुती गणेश मूर्ती विसर्जनासाठी सहा ठिकाणी अमृत कलश कुंड बसविण्यात येणार आहेत. यामध्ये आदर्श महाविद्यालय जवळ, एनटीसी भागातील महेश उद्यान, नवीन नगर पालिका मुख्य प्रवेशद्वार, छत्रपती शिवाजी नगर येथील दत्त मंदिर तसेच अग्नीशमन दल कार्यालयाजवळ हे कुंड बसविले जाणार आहेत. या कुंडाच्या बाजूलाच निर्माल्य संकलन कुंड बसविण्यात येणार असून गणेशमूर्ती विसर्जनापुर्वी निर्माल्य संकलन करून त्यानंतर कुंडामध्ये गणेशमूर्ती विसर्जीत करता येणार आहे. यासहा ठिकाणी पालिकेचे मुख्याधिकारी प्रांजली मुंढे, उपमुख्याधिकारी प्रकाश साबळे, बाळू बांगर, स्वच्छता निरीक्षक आकाश देशमुख, विद्युत अभियंता साहेब भुरके, कार्यालयीन अधिक्षक सचिन पवार यांच्या पथकाने पाहणी केली आहे. या सहा कुंडा जवळ पालिकेचा एक अधिकारी व तीन कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. अमृतकलश कुंडात गणेशमूर्तीचे विसर्जन करावे हिंगोली पालिका मुख्याधिकारी प्रांजली मुंढे म्हणाल्या की, शहरातील लहान गणेश मंडळे तसेच घरगुती गणेशमूर्ती विसर्जनाची सोय व्हावी यासाठी पालिकेने अमृत कलश कुंड उभारण्याचा निर्णय घेतला आहे. गणेश मंडळांनी या ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जीत करून पालिका प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच संकलीत निर्माल्यापासून कंपोस्ट खत तयार करून शहरातील झाडांसाठी उपलब्ध केले जाणार आहे.
Source link
हिंगोली शहरात गणेशमुर्ती विसर्जनासाठी सहा ठिकाणी अमृत कलश कुंड:निर्माल्य संकलन केले जाणार, पालिका प्रशासनाकडून जय्यत तयारी