![]()
राज्याच्या आदिवासी विकास विभागांतर्गत चालवल्या जाणाऱ्या 558 अनुदानित आश्रमशाळांचे आता ‘थर्ड पार्टी ऑडिट’ सुरू केले जाणार असून, यातील 80 टक्क्यांहून अधिक आश्रमशाळा या काँग्रेस नेत्यांशी संबंधित असल्याचा आरोप आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी केला आहे. दुसरीकडे, कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आदिवासी विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून विदर्भातून ‘आदिवासी स्कूल सुधारो’ हे अभियान सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर, दिपके यांनी काँग्रेस नेते व पदाधिकाऱ्यांच्या शाळांमध्ये जाऊन प्रत्यक्ष वास्तव पाहावे आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, तरच त्यांचे हे अभियान खऱ्या अर्थाने सार्थकी ठरेल, असे सांगत मंत्री डॉ. उईके यांनी अभिजित दिपके यांना या शाळा पाहण्याचे थेट आवाहन केले आहे. डॉ. अशोक उईके म्हणाले, कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांच्या आश्रमशाळा वगळून तुम्ही पाहणी केली, तर तुम्ही 100 टक्के राजकारण करत आहात. त्यामुळे 100 टक्के अनुदानावर असलेल्या आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट आदिवासी विभागाकडून सुरू झाले आहे. या ऑडिटमुळे संस्थाचालक कॉंग्रेसचे नेते आणि पदाधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे, असे उईके यांनी म्हटले आहे. आदिवासी आणि दुर्गम भागाकडे नेहमीच दुर्लक्ष- अभिजीत दिपके कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके हे दोन दिवसांच्या गडचिरोली दौऱ्यावर असून, त्यांनी एटापल्ली तालुक्यातील डुम्मे, कोसा आलेंगा आणि पायडी या गावांमधील जिल्हा परिषद शाळांना भेटी देऊन व्यवस्थेची पाहणी केली. शासनाचे आदिवासी आणि दुर्गम भागाकडे नेहमीच दुर्लक्ष झाले असून, गडचिरोलीसारख्या घटना मुंबई, पुण्यात घडल्या असत्या तर मोठा हंगामा झाला असता, असे ते म्हणाले. गेल्या दोन वर्षांत 590 आदिवासी विद्यार्थ्यांचा विविध कारणांनी मृत्यू झाला आहे. मात्र शासन शाळांमध्ये मूलभूत सुविधा पुरवण्याकडे दुर्लक्ष करत असून, आदिवासी विद्यार्थ्यांच्या मृत्यूची किंमत केवळ दोन लाख रुपये ठरवून मोकळे होत असल्याचा गंभीर आरोप दिपके यांनी केला. या दौऱ्यादरम्यान ते भामरागड तालुक्यातील ताडगाव जिल्हा परिषद शाळेला भेट देणार असून गावकरी आणि सफाई कामगारांशीही चर्चा करणार आहेत. नंदुरबारमधील गैरसोयींवरून प्रशासनावर रोष दरम्यान, अभिजीत दिपके यांनी नंदुरबारमधील अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागातील ‘सरी’ आदिवासी आश्रमशाळेला भेट दिली आणि तेथील दुरवस्था पाहून तीव्र संताप व्यक्त केला. मला सांगायला लाज वाटते की मी गेल्या 26 वर्षांनंतर नंदुरबारमध्ये परतलो आहे, पण 25 वर्षांनंतरही इथल्या दुर्गम भागाची परिस्थिती तशीच आहे. मी नंदुरबारमध्येच वाढलो, तेव्हाही इथे वीज नव्हती आणि आजही अंधारच आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आश्रमशाळांमध्ये वेळेवर वीज नसणे आणि विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणीही मिळत नसल्याचे पाहून संतापलेल्या दिपके यांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र रोष व्यक्त केला.
Source link
राज्यातील 558 अनुदानित आश्रमशाळांचे 'थर्ड पार्टी ऑडिट' होणार:मंत्री अशोक उईके यांची घोषणा; अभिजीत दिपकेंनाही आव्हान