![]()
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. संचालकांच्या 21 जागांसाठी 2019 मतदार मतदान करणार असल्याने प्रत्येक मतदारसंघातील राजकीय आणि संस्थात्मक समीकरणांना महत्त्व प्राप्त झाले आहे. उमेदवारी निश्चितीपासून पॅनेलच्या बांधणीपर्यंत पुढील काही दिवसांत जोरदार हालचाली होण्याची होण्याची चिन्हे आहेत. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची आचारसंहितालागू झाली असून एक नोव्हेंबर रोजी मतदान तर तीन नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. जिल्हा बँकेच्या सत्ताकारणात विविध राजकीय गटांचा प्रभाव असल्याने ही निवडणूक केवळ सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींची निवड न राहता स्थानिक राजकीय समीकरणांचीही परीक्षा घेणारी ठरणार आहे. महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट आणि शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट यांच्यातील स्थानिक समन्वय कसा होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विशेषतः विद्यमान संचालकांना पुन्हा संधी मिळणार का, नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार का, कोणत्या मतदारसंघात कोणत्या गटाचे प्राबल्य आहे आणि संभाव्य उमेदवारांमागे किती संस्थात्मक ताकद आहे, यावर उमेदवारीची गणिते ठरण्याची शक्यता आहे. काही मतदारसंघांत पक्षीय समीकरणांपेक्षा स्थानिक गटांचे संबंध आणि सहकारी संस्थांमधील संपर्क अधिक महत्त्वाचा ठरू शकतो. कृषी पतपुरवठा व विकास सेवा सोसायट्या, महिला, अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती-भटक्या जमाती, विशेष मागासवर्गीय, कृषी पणन, शेतीमाल प्रक्रिया, नागरी बँका व पतसंस्था, दूध उत्पादक, औद्योगिक, गृहनिर्माण, विणकर, मजूर आणि पाणीपुरवठा अशा विविध मतदारसंघांतून संचालकांची निवड होणार आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघाचे स्वतंत्र राजकीय गणित महत्त्वाचे ठरणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होताच इच्छुकांची संख्या आणि त्यामागील गट स्पष्ट होऊ लागतील. त्यानंतर माघारीच्या टप्प्यात कोणत्या उमेदवारांना एकत्र आणले जाते आणि कोणत्या मतदारसंघात थेट लढत राहते, यावर निवडणुकीचे अंतिम चित्र अवलंबून असेल. दरम्यान, जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू असतानाच जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवरही दोन्ही निवडणुकांच्या प्रक्रियेकडे लक्ष ठेवावे लागणार आहे. मतदारसंघनिहाय बैठकांना येणार महत्त्व जिल्हा बँकेच्या निवडणुकीत 2019 मतदार असल्याने प्रत्येक मतदारसंस्थेशी संपर्क आणि मतदारसंघनिहाय बैठकांना महत्त्व प्राप्त होणार आहे. इच्छुक उमेदवारांकडून आतापासूनच संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला जाण्याची शक्यता आहे. पॅनेलची बांधणी, संभाव्य उमेदवारांची निवड आणि स्थानिक गटांना सामावून घेण्याचे आव्हान प्रमुख नेत्यांसमोर राहणार आहे. निवडणूक वेळापत्रक: उमेदवारी अर्ज दाखल: २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर (सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत) दाखल अर्जांची यादी प्रसिद्धी: दररोज सायंकाळी ४ वाजता अर्जांची छाननी: ५ ऑक्टोबर (दुपारी १२ वाजता) वैध अर्जांची अंतिम यादी: ६ ऑक्टोबर (सकाळी ११ वाजता) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत: ६ ते २१ ऑक्टोबर अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप: २२ ऑक्टोबर (सकाळी ११ वाजता) प्रत्यक्ष मतदान: १ नोव्हेंबर (सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत) मतमोजणी: ३ नोव्हेंबर (सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत, मतमोजणीचे ठिकाण यथावकाश जाहीर केले जाईल) निवडणूक निर्णय अधिकारी: संजयकुमार सुद्रिक (जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सातारा) जिल्हा निवडणूक अधिकारी: डॉ. महेश कदम (विभागीय सहनिबंधक, कोल्हापूर)
Source link
सातारा जिल्हा बँकेच्या राजकारणाला आता वेग!:21 जागांसाठी 2019 मतदार; इच्छुकांची धावपळ, गटबाजीला येणार धार