Headlines

भेंडा उपकेंद्रासमोर शेतकऱ्यांचे धरणे:लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे, शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मान्य; धरणे आंदोलन स्थगित‎




नेवासे तालुक्यातील भेंडा येथील वीज उपकेंद्रासमोर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या मोर्चाचे धरणे आंदोलनात रूपांतर झाले. शेतकऱ्यांच्या काही मागण्या मान्य करून उर्वरित मागण्या वरिष्ठ पातळीवर सोडविण्याचे आश्वासन वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. मागण्या लेखी स्वरूपात देण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. शासनाच्या नवीन धोरणानुसार शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. वीजपुरवठ्यातील अडचणी, शेतीसाठी आवश्यक वीज उपलब्धता तसेच इतर विविध मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सेक्रेटरी भारत आरगडे, किसान सभेचे जिल्हा सेक्रेटरी आप्पासाहेब वाबळे, सौंदळ्याचे सरपंच शरद आरगडे व भेंड्याचे सरपंच वैभव नवले यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चात परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग घेत भेंडा वीज उपकेंद्रासमोर धरणे आंदोलन सुरू केले. दरम्यान, उदयन गडाख यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. वीज वितरण व्यवस्थेतील अडचणी तातडीने दूर करून शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. दरम्यान,अधिकारी व शेतकरी यांच्यात उशिरा समन्वय साधण्यात आला. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर चर्चा करून काही मागण्या मान्य करण्यात आल्या, तर उर्वरित मागण्या वरिष्ठ पातळीवर सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले. याबाबत अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना लेखी पत्र दिल्यानंतर उपस्थितांच्या वतीने धरणे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *