![]()
येथील प्राचीन ‘श्री एकविरा गणेशोत्सव मंडळ’ ने यावर्षी मराठी भाषा अन् संस्कृतीच्या संवर्धनाचा उपक्रम हाती घेतला. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी उपक्रमाची घोषणा, देखावा न करता कृती म्हणून मराठी शाळा दत्तक घेतली ‘मराठी पाऊल पुढे पडेल; पण मराठी शाळा वाचल्या तरच ना!” असा संदेश देत या मंडळाने शहरातील एका मराठी शाळेला दत्तक घेतले. मंडळाच्या या उपक्रमाची दखल अमरावतीकरांनी घेतली असून,या मंडळाचे कार्य व त्याला अनुसरुन त्यांनी गणेशोत्सवात सादर केलेला देखावा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. अंबादेवी मंदिर परिसरातील श्री एकविरा गणेशोत्सव मंडळाचे यंदा ५९ वे वर्ष आहे. १९६७ मध्ये मंडळाचे संस्थापक विष्णुकांत तमास्कर यांच्या हस्ते श्री एकविरा मंदिरात गणेशमूर्तीची स्थापना केली होती. तेव्हापासूनच या मंडळाने धार्मिक उत्सव न साजरा करता सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, सांस्कृतिक पर्यावरणविषयक उपक्रमांची समृद्ध परंपरा जपली.यंदाच्या गणेशोत्सवात मंडळाने तिवसा तालुक्यातील जि.प. प्राथमिक शाळेला दत्तक घेतले. या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासह क्रीडा व पर्यावरणपूरक साहित्य देण्यासाठी मंडळ प्रयत्नशील आहे. याशिवाय मराठी शाळांची घटती संख्या,मातृभाषेच्या संवर्धनाची गरज लक्षात घेऊन, समाजात जनजागृतीच्या उद्देशाने मंडळातर्फे यंदा विज्ञान प्रदर्शनाचीही उभारणी केली आहे.मराठी शाळा टिकवणे, मराठी भाषा, संस्कृती जपणे ही काळाची गरज असून, या भावनेने प्रेरित होऊन श्री एकवीरा गणेशोत्सव मंडळाने साकारलेला हा सामाजिक उपक्रम इतर मंडळांसाठीही मार्गदर्शक ठरत आहे. मराठी शाळा वाचवण्यासाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी यावर्षी अशी कलात्मक सजावट केली आहे. मंडळाला ३० हून अधिक पुरस्कार श्री एकवीरा गणेशोत्सव मंडळाला त्यांच्या सामाजिक व सांस्कृतिक योगदानासाठी आजवर ३० पुरस्कारांनी गौरवले आहे. दरवर्षी महाराष्ट्र शासन, अमरावती महापालिकेतर्फे दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाच्या पुरस्कारांवर या मंडळाने आपले नाव कोरले आहे. ही पुरस्कारांची परंपरा म्हणजे मंडळाच्या पर्यावरणपूरक व समाजोपयोगी कार्याची पावती मानली जाते.
Source link