Headlines

आरोग्य विभागाने दिली माहिती:वैद्यकीय योजनांचा ‘लोकसंवाद'; अकोल्यात आरोग्याचा महाजागर, जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम‎




सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम, वैद्यकीय उपचार सुविधा आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती नागरिकांपर्यंत थेट पोहोचवण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे लोकसंवाद- २०२६ हा विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे. श्री गणेशा आरोग्याचा या दोन्ही उपक्रमांतर्गत अकोला शहरातील जठारपेठ चौकातील स्वराज्य गणेशोत्सव मंडळापुढे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. शीतल गावंडे यांच्याद्वारे आयुष्यमान भारत, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना, मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाद्वारे वैद्यकीय मदत आदी आरोग्यविषयक योजनांविषयी माहिती नागरिकांना देण्यात आली. गणेशोत्सवाच्या औचित्यप्रसंगी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून राज्यभरात १६ ते २४ सप्टेंबर दरम्यान लोकसंवादाचा उपक्रम राबवण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून बीपीएल, एपीएल केशरी कार्डधारकांना पाच लाखांपर्यंतच्या वैद्यकीय उपचार सुविधा दिल्या जातात. राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना, जिल्हा परिषद प्रशासनाद्वारे ग्रामीण भागात राबवण्यात येणाऱ्या वैद्यकीय उपचार व सेवा सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा. असे जिल्हा परिषदेचे माध्यम समन्वयक घुगे यांनी यावेळी सांगितले. राज्य शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केले आहे. हाच धागा पकडून जिल्हा माहिती कार्यालयाने ‘लोकसंवाद-२०२६’च्या माध्यमातून ही माहिती थेट जनतेपर्यंत पोहोचवण्याचा यशस्वी उपक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमाप्रसंगी माहिती अधिकारी विजय राऊत यांनी लोकसंवाद-२०२६ या उपक्रमाविषयी माहिती दिली. यावेळी स्वराज्य गणेशोत्सव मंडळाचे प्रशांत पाटील, नगरसेवक गिरीश गोखले, मंडळाचे अन्य सदस्य, पदाधिकारी, भक्तगण, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ८२ रुग्णालये अंतर्भूत आयुष्यमान कार्ड कुठल्याही सेवा सेतू केंद्रातून बीआयएस पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करून प्राप्त करून घेता येते. यासाठी प्रथम घरातील सर्व सदस्यांची ई-केवायसी करून घेणे आवश्यक आहे. अकोला शहरातील ८२ रुग्णालये या योजनेत अंतर्भूत आहेत. जिल्ह्यातील सर्व गोरगरीब, गरजू व पात्र नागरिकांनी आयुष्यमान भारत योजनेत नोंदणी करावी. असे आवाहन डॉ. गावंडे यांनी केले. राज्य शासनाच्या वैद्यकीय सेवा सुविधांच्या योजनांसंदर्भात अधिक माहितीसाठी शासकीय रुग्णालय, महापालिका रुग्णालय, नगरपरिषद रुग्णालय, आरोग्य सेवक, आशा सेविका आदिशी संपर्क साधावा. असेही आवाहन डॉ. गावंडे यांनी यावेळी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *