![]()
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कर्मवीर भाऊराव पाटील यांची 139 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. ‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत हा कार्यक्रम घेण्यात आला. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख वक्ते म्हणून डॉ. गणेश राऊत उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. गणेश भामे आणि विद्यार्थी विकास मंडळाच्या संचालिका डॉ. सविता कुलकर्णी यांचीही विशेष उपस्थिती होती. अध्यक्षीय भाषणात डॉ. पराग काळकर यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले, “अडचणीतून मार्ग काढणारे अनेक विद्यार्थी आज या योजनेमुळे समाजाच्या विविध क्षेत्रांत यशस्वीपणे काम करत आहेत.” डॉ. काळकर यांनी विशेष कौतुक करत सांगितले की, या योजनेच्या माजी विद्यार्थ्यांनी वाघोली येथे गरजू मुलींसाठी मोफत वसतिगृह सुरू केले आहे. यातून त्यांनी समाजाप्रती आपली जबाबदारी कृतीतून दाखवून दिली आहे. हाच कर्मवीर विचारांचा खरा वारसा आहे. याच योजनेतून घडलेले आणि आज यशस्वी असलेले प्रमुख वक्ते डॉ. गणेश राऊत यांनी ‘कमवा व शिका योजना: विद्यार्थ्यांची स्वयंपूर्णतेच्या दिशेने वाटचाल’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, ही योजना फक्त आर्थिक मदत किंवा कामापुरती मर्यादित नाही. ही योजना विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण, कौशल्ये आणि नेतृत्वगुण विकसित करणारी एक मजबूत चळवळ आहे. त्यांनी स्वतःच्या जीवनातील उदाहरणे देत विद्यार्थ्यांना कष्ट आणि चिकाटीने स्वप्ने पूर्ण करण्याचा सल्ला दिला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी रयत शिक्षण संस्थेचे गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवनावर आधारित एक नाटिकाही सादर करण्यात आली. या नाटिकेने अनेकांच्या डोळ्यात पाणी आणले. जयंतीनिमित्त विद्यापीठात निबंध आणि भित्तीपत्रक स्पर्धा घेण्यात आल्या. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांचा सत्कार करून त्यांचे कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थी विकास मंडळाच्या संचालिका डॉ. सविता कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी ‘कमवा व शिका’ योजनेचे महत्त्व आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच, योजनेच्या पुढील वाटचालीचा आराखडाही त्यांनी सादर केला.
Source link
'कमवा व शिका' योजनेच्या विद्यार्थ्यांनी जपली सामाजिक बांधिलकी:कर्मवीर भाऊराव पाटील यांची 139 वी जयंती उत्साहात साजरी, डॉ. काळकर यांचे कौतुक