Headlines

मातंग समाजाचा 29 सप्टेंबरला मुंबईत आरक्षण उपवर्गीकरणासाठी महामोर्चा:पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातून 50 हजार समाजबांधव सहभागी होणार, पुण्यात घोषणा




अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे अ, ब, क, ड अथवा लाभधारक आणि लाभवंचित अशा पद्धतीने उपवर्गीकरण तातडीने लागू करण्याच्या मागणीसाठी मातंग समाजाने मुंबईत एल्गार पुकारला आहे. २९ सप्टेंबर रोजी मंत्रालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात राज्यभरातून लाखो समाजबांधव सहभागी होतील, तर पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातून किमान ५० हजार समाजबांधव सहभागी होतील, अशी घोषणा गुरुवारी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या १ ऑगस्ट २०२४ रोजीच्या अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणासंदर्भातील निर्णयामुळे राज्य सरकारने ही प्रक्रिया तातडीने राबवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मातंग समाजाच्या विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि आरक्षणाशी संबंधित प्रश्नांसाठी राज्यभरात आतापर्यंत ७७ मोर्चे काढण्यात आले आहेत. आता या सर्व आंदोलनांची पुढची दिशा म्हणून २९ सप्टेंबरच्या मुंबई महामोर्चात राज्यातील मातंग समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. पत्रकार भवन, नवी पेठ येथे झालेल्या पत्रकार परिषदेला माजी राज्यमंत्री रमेश बागवे, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार अमित गोरखे, आमदार सुनील कांबळे, क्रांतिगुरू लहुजी शक्ती सेनेचे विष्णूभाऊ कसबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुभाष जगताप, पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचे स्वागताध्यक्ष अनिल हातागळे आणि सचिव अॅड. महेश सकट, लहुजी स्मारकाचे अध्यक्ष अशोक लोखंडे, नगरसेवक प्रसेनजित वैरागे, भास्कर नेटके यांच्यासह विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांमधील मातंग समाजाचे प्रमुख नेते उपस्थित होते. आरक्षण उपवर्गीकरणाची अंमलबजावणी, समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर ठोस निर्णय आणि सामाजिक न्यायाच्या मागण्यांसाठी २९ सप्टेंबरचा महामोर्चा निर्णायक ठरणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *