![]()
अहिल्यानगरजवळील विळद घाट परिसरातील प्रसिद्ध ‘मातोश्री’ वृद्धाश्रमात एक अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारी घटना घडली आहे. वृद्धांच्या सुरक्षिततेसाठी आणि आधारासाठी असलेल्या या आश्रमात राजू घुले या वृद्धाने पहाटे 6 च्या सुमारास झोपेत असलेल्या आपल्या सहकारी वृद्धांवर लोखंडी रॉडने हल्ला केला. या रक्तरंजित घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला असून इतर 6 वृद्ध गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी राजू घुले याचा उजवा हात सतत थरथरत असायचा. याच कारणावरून वृद्धाश्रमातील इतर सहकारी त्याला नेहमी चिडवत असत. या अपमानाचा तीव्र राग मनात धरून आरोपीने सर्वजण गाढ झोपेत असताना त्यांच्या डोक्यात आणि पायावर लोखंडी रॉडने जोरदार वार करत हा भयंकर गुन्हा केला. मृतांची आणि जखमींची माहिती या प्राणघातक हल्ल्यात मंकाळेश्वर हेणे आणि दत्तात्रेय हारके या दोन वृद्धांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर गणेश घोडके, बाळासाहेब घाडगे, गोरख फुंदे, साहेबराव भवर, लिंबराज फिसके आणि संतोष पिरगल हे 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यापैकी एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. आरोपीची पार्श्वभूमी आरोपी राजू घुले हा मूळचा कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी (कुंभारी) येथील रहिवासी आहे. तो अविवाहित असून त्याचा भाचा प्रयाग सानप याने त्याला 3 नोव्हेंबर 2025 रोजी मातोश्री वृद्धाश्रमात दाखल केले होते. विशेष म्हणजे, आरोपीची वृद्धाश्रमातून त्याच्या बहिणीकडे रवानगी होणार होती आणि त्यासाठी त्याची बहीण त्याला घेण्यासाठी नाशिकहून नगरकडे येत होती. एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल बहीण वृद्धाश्रमात पोहोचण्यापूर्वीच आरोपीने रागाच्या भरात हे टोकाचे पाऊल उचलले आणि दोन सहकाऱ्यांचा जीव घेतला. या प्रकरणी वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक दिलीप चोरडिया यांच्या फिर्यादीवरून अहिल्यानगरच्या एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी हत्येसाठी वापरलेला लोखंडी रॉड हस्तगत केला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
Source link
मातोश्री' वृद्धाश्रमात रक्ताचा सडा!:चिडवल्याच्या रागातून झोपलेल्या सहकाऱ्यांवर लोखंडी रॉडने हल्ला; 2 वृद्धांचा मृत्यू