![]()
राज्यात भिषण दुष्काळी परिस्थिती असतांनाही शासनाने केवळ पोकळ आश्वासनांचा शासन निर्णय जारी केल्याचा आरोप करून क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी ता. २६ गोरेगाव (ता. सेनगाव) येथे शासन निर्णयाची होळी केली. शेतकऱ्यांना सरसगट हेक्टरी १ लाख रुपये देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मराठवाड्यासह राज्यभरात यावर्षी भिषण दुष्काळ निर्माण झाला आहे. मागील एक महिन्यापासून पाऊस नसल्यामुळे खरीप हंगामाची पिके हातची गेली आहेत. आता कुटुंबाच्या उदरनिर्वाहाच्या प्रश्नासोबतच रब्बी हंगामातील पेरणीचा प्रश्नही निर्माण झाला आहे. जमीनीमध्ये ओल नसल्याने रब्बी हंगाम पेरणीपुर्वीच हातचा गेल्याचे स्पष्ट होत आहे. मराठवाड्यात सर्वच जिल्हयांमधून सोयाबीन, तूर, मूग, उडीद, हळद, कापूस, मका, ज्वारी यांसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील पिके हातची गेली असताना केवळ कागदावर दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक होणार नाही. शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष आर्थिक मदत जमा झाली पाहिजे, अशी भूमिका क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे मांडली आहे. शासनाने दुष्काळ जाहिर केलेला शासन निर्णय शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारा आहे. यामध्ये शेतकऱ्यांना प्रत्यक्ष किती आणि कशी मदत मिळणार, याबाबत स्पष्टता आणि पुरेशी आर्थिक तरतूद आवश्यक आहे. त्यामुळे किती व कशी मदत मिळणार याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे या शासन निर्णयाची गोरेगाव येथे होळी करण्यात आली. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, प्रविण मते, गजानन काळे, सखाराम भाकरे, शांतीराम सावके यांची उपस्थिती होती. यावेळी शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी एक लाख नुकसानभरपाई द्यावी. कोरड्या दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट पीक विम्याची रक्कम द्यावी, पिककर्ज द्यावे अशी मागणी करण्यात आली. तर मराठवाडाभर आंदोलन करणार- गजानन कावरखे, मराठवाडा अध्यक्ष क्रांतीकारी शेतकरी संघटना शासनाने दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी ठोस आणि प्रत्यक्ष आर्थिक मदतीचे पॅकेज जाहीर करावे. दुष्काळामुळे झालेल्या पीक नुकसानीचे पारदर्शक पंचनामे करून नुकसानभरपाई तातडीने अदा करावी अन्यथा मराठवाड्यात आंदोलन केले जाईल.
Source link
गोरेगावात क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडून दुष्काळाच्या शासन निर्णयाची होळी:सरसकट हेक्टरी एक लाख रुपये देण्याची मागणी