![]()
सिन्नर शहराची ऐतिहासिक जीवनवाहिनी असलेल्या देवनदीच्या पात्रात गणेश विसर्जन आणि मोठ्या प्रमाणावर निर्माल्य टाकण्यात आले आहे. पूर्वी याच देवनदीच्या तीरावरील विहिरींमधून संपूर्ण सिन्नर शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात असे. त्यामुळे या पवित्र आणि ऐतिहासिक नदीची झालेली दुरवस्था पाहून नदीकाठच्या ग्रामस्थांनी तीव्र संताप व नाराजी व्यक्त केली आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी सिन्नर नगरपालिकेने यावर्षी प्रत्येक प्रभागामध्ये ‘कृत्रिम जलकुंड’ उभारून एक उत्तम आणि स्तुत्य उपक्रम राबवला होता. बहुतांश सिन्नरकरांनी या आवाहनाला प्रतिसाद देऊन कृत्रिम कुंडात विसर्जन केले. मात्र, काही बेजबाबदार नागरिकांनी या आवाहनाकडे पूर्णपणे डोळेझाक करत थेट देवनदीच्या पात्रात श्री गणेशाचे विसर्जन केले आणि प्लास्टिकसह निर्माल्य पाण्यात फेकून दिले. ढोकी फाटा परिसरातील स्थानिक ग्रामस्थ स्वप्निल काळे यांनी नदीपात्रात जागोजागी तरंगणाऱ्या गणेशमूर्ती आणि प्लास्टिकच्या पिशव्यांमधील सडणारे निर्माल्य यामुळे नदीचे पाणी दूषित झाले आहे. “माझ्या घराशेजारील शेतातूनच ही देवनदी वाहते. नदीपात्रात तरंगत असलेल्या गणेशमूर्ती आणि निर्माल्य पाहून मन अत्यंत व्यथित झाले. शहराला पाणी देणाऱ्या नदीची ही अवस्था मनाला क्लेश देणारी असल्याचे ते म्हणाले. केवळ प्रशासनावर विसंबून न राहता, या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आता स्थानिक नागरिक आणि गणेश मंडळे पुढे आली आहेत. “पुढील वर्षी आम्ही स्वतः आमच्या गणेश मंडळाच्या वतीने नदीकाठावर ‘निर्माल्य गोळा करण्यासाठीची विशेष व्यवस्था’ उभी करू, जेणेकरून कोणीही भाविक नदीपात्रात कचरा टाकणार नाही,” असा ठाम निर्धार ग्रामस्थ स्वप्निल काळे यांनी व्यक्त केला आहे. नदीचे पावित्र्य राखण्यासाठी प्रशासनाने नदीपात्राची तात्काळ स्वच्छता करावी आणि प्रदूषण करणाऱ्यांवर कडक देखरेख ठेवावी, अशी मागणी आता सिन्नरकरांमधून होत आहे. त्वरित नदीपात्राची स्वच्छता कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात येईल. तसेच यापुढे सिन्नर शहरामध्ये कृत्रिम कुंडांची व्यवस्था करताना नागरिकांना आपण एखाद्या नदीपात्रात विसर्जन करत आहोत अशा स्वरूपाची तयारी प्रत्येक प्रभागात केली जाईल.नागरिकांनीही नदीचे पावित्र्य राखण्यासाठी सहकार्य करून यापुढे थेट नदीपात्रात कचरा अथवा निर्माल्य टाकणे टाळावे. – विठ्ठल उगले ,नगराध्यक्ष
Source link
निष्काळजी:सिन्नरच्या देवनदी पात्रात प्लास्टिक आणि निर्माल्य टाकल्याने प्रदूषण