![]()
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेमुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा ‘फेक नरेटिव्ह’ पूर्णपणे उघडा पडला असल्याचा दावा करत, राहुल गांधी संवैधानिक संस्थांना बदनाम करून देशात अतिडावी राजवट आणण्याचा आणि अराजकता माजवण्याचा प्रयत्न करत असल्याचा घणाघाती आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. संविधानाचे पुस्तक हातात घेऊन घटनात्मक संस्थांवरील जनतेचा विश्वास उडवणे हे राहुल गांधींचे पूर्वनियोजित डिझाइन असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केलेली अराजकतेची भीती आज ते खरी करून दाखवत असल्याचेही फडणवीस यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला असं वाटतं की काल तीनही निवडणूक आयुक्तांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यामुळे राहुल गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा फेक नरेटिव्ह हा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे. मी पहिल्या दिवशीपासून सांगतो आहे राहुल गांधी यांच डिझाईन वेगळं आहे. संविधानाचं पुस्तक हातामध्ये घेऊन संवैधानिक संस्थांवर रोज आरोप लावायचे, संवैधानिक संस्था प्रश्नांकित करायच्या, त्याच्यावरचा लोकांचा विश्वास उडवायचा अशा पद्धतीची कारवाई आहे. भारतीय संविधान ते जरी दाखवत असले तरी त्यांना या संविधानाने दिलेली लोकशाही काही मान्य नाहीये, या संविधानाने तयार केलेल्या संवैधानिक संस्था मान्य नाहीयेत. पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझं तर स्पष्ट मत आहे की राहुल गांधींना हळूहळू सर्व संवैधानिक संस्था बदनाम करून भारतीय संविधानावरच प्रश्नचिन्ह उभं करायचं आहे. कारण आता त्यांचं संपूर्ण मानसिकता ही कम्युनिस्ट, साम्यवादी, अतिडावी झालेली आहे आणि त्यांना या भारतामध्ये अतिडावी राजवट आणायची आहे, असा दावाही फडणवीस यांनी केला आहे. संविधानावरनं लोकांचा विश्वास उठवण्याचा राहुल गांधींचा प्रयत्न तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या शेवटच्या भाषणामध्ये, संविधान सभेमध्ये जे बोलून दाखवलं होतं, जी शंका सांगितली होती आणि ज्या प्रकारची एनार्की (अराजकता) तयार केली जाऊ शकते हे सांगितलं होतं, ते राहुल गांधी स्पष्टपणे करताना दिसतायत. त्यामुळे निश्चितपणे ते हळूहळू या संविधानावरनं लोकांचा विश्वास उठला पाहिजे अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न दिसतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, खरं तर आपण जर काल बघितलं तर कालच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये एका वृत्तपत्राने छापलेली बातमी ही किती कपोलकल्पित आहे हे स्पष्ट झालेलं आहे आणि त्या बातमीवर आधारित जे आंदोलन उभं राहतंय तेही किती तकलादू आहे हे आपल्यासमोर आलेलं आहे. SIR सहित सगळ्या प्रक्रिया एक मताने झाल्याचे आयुक्तांनी सांगितलेय तीनही आयुक्तांनी सांगितलं SIR सहित सगळ्या प्रक्रिया एक मताने झालेल्या आहेत. या प्रक्रियेमध्ये कुठेही डिफरन्स ऑफ ओपिनियन नाहीये. कॅबिनेट सेक्रेटरीकडे गेलेलं पत्र हे कुठल्याही नीतिगत विषयावरच पत्र नाही, कुठल्याही धोरणावरच पत्र नाही, तर एक जी डेपुटेशनवर झालेली अपॉइंटमेंट आहे या अपॉइंटमेंटशी संबंधित पत्र आहे. मात्र जणू काही डिफरन्सेसने पत्र पाठवलेलं आहे असं देखील सांगण्याचा प्रयत्न केलाय, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. संभ्रम निर्माण करण्याचं काम सुरू देवेंद्र फडणवीस म्हणाले, सर्वात महत्त्वाचा फॉर्म नंबर सहाच्या संदर्भात, माननीय सर्वोच्च न्यायालयाने फॉर्म नंबर सहा हा ज्या फॉरमॅटमध्ये वैध ठरवलेला आहे, त्याच फॉरमॅटमध्ये फॉर्म नंबर सहा असताना त्या संदर्भात संभ्रम निर्माण करणं म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भात एक प्रकारे संभ्रम निर्माण करण्याचं काम चाललेलं आहे. आणि म्हणून एकूणच काल या आरोपातला फोलपणा स्पष्ट झालेला आहे. संवैधानिक संस्थांना बदनाम करण्याचा प्रयत्न मुळात काँग्रेस आणि राहुल गांधी आपली संविधान विरोधी भूमिका ही या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतायत. संवैधानिक संस्थांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत आणि जनतेमध्ये विश्वास उरलेला नाही, तो आपल्याला विश्वास मिळवता येत नाही म्हणून सिस्टीमबद्दल अविश्वास निर्माण करायचा अशा प्रकारचा हा प्रयत्न आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. साम्यवादी राजवट आम्ही आणू देणार नाही पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले, ही स्ट्रॅटजी कुठेही कामी येणार नाही. जनतेला हे समजतं आणि कुठल्याही परिस्थितीत ही जी काही संवैधानिक संस्थांना बदनाम करण्याची त्यांची मोहीम आहे, याला योग्य उत्तर मिळेल. भारताचं संविधान, त्या संविधानाने तयार केलेल्या संस्था या अबाधितच राहतील. किती प्रयत्न केला तरी इथे साम्यवादी राजवट आम्ही आणू देणार नाही. हारण्याचं खापर निवडणूक आयोगावर फोडातात निवडणूक आयोग भाजपचं बी टीम असल्याची टीका विरोधकांकडून केली जाते. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, जे जे लोक हारतात त्या त्या लोकांना हारण्याचं खापर निवडणूक आयोगावर फोडायची इच्छा असते. तेलंगणाला जिंकल्यानंतर निवडणूक आयोग चांगलं असतं, पंजाबमध्ये जिंकल्यानंतर ते चांगलं असतं, हिमाचलमध्ये जिंकल्यानंतर ते चांगलं असतं, कर्नाटकला जिंकल्यानंतर ते चांगलं असतं, पण भाजप जिंकल्याबरोबर त्याच निवडणूक आयोगाला कोणते शिंग फुटतात मला माहिती नाही आणि मग ते लगेच खराब होतं. जनतेमध्ये जाऊन जनतेचे प्रश्न त्या ठिकाणी मांडा, तर जनता तुमच्या पाठीशी येईल, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. तसेच आधी ईव्हीएम होतं, आता ईव्हीएमच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. ईव्हीएमच्या संदर्भात इलेक्शन कमिशनने चॅलेंज दिला 15 दिवस ज्याला ईव्हीएम हॅक करता येतंय करून दाखवा, यांच्यापैकी कोणी करू शकलं नाही. त्यामुळे आता ईव्हीएम यांनी सोडलं आणि आता इलेक्शन कमिशनलाच घेऱ्यामध्ये घ्यायचा प्रयत्न हे करतायत जे अतिशय चुकीचं आहे, असे फडणवीस म्हणाले. हे वोट चोरी म्हणतायत पण यांचा मेंदू चोरीला गेलेला महाराष्ट्राची आणि इतर काही राज्यांची निवडणुका रद्द करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे, यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, हे वोट चोरी म्हणतायत पण यांचा मेंदू चोरीला गेलेला आहे. मी तर माननीय पंतप्रधान महोदयांना विनंती करतो की एखादी अशी कमिटी तयार करता येईल का की जी यांचा मेंदू यांना परत आणून देईल जो चोरी गेलेला आहे किंवा त्यांनी गहाण ठेवलेला आहे तो त्यांना परत मिळेल अशी एखादी व्यवस्था करता येईल का अशी माझी मागणी आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला. या संपूर्ण प्रकरणामध्ये SIR मध्ये तुमच्याही मतदार संघामध्ये खूप सारी मतं कमी झालेली आहेत म्हणजे नागपूर लोकसभा असेल किंवा ठाणे असेल अनेक ठिकाणी मतं कमी झालेली आहेत, नरेटिव्ह पसरला जातोय भारतीय जनता पक्ष आणि इलेक्शन कमिशन यांचं कनेक्शन आहे, असं तुम्हाला नुकसान झालंय का? या प्रश्नावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो की पश्चिम बंगालमध्ये ज्या मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात SIR मध्ये मतदार कमी झाले असे 15 मतदारसंघ आहे की जिथे टीएमसी निवडून आलं. का निवडून आलं? मग जर मतदार भाजपचेच होते आणि बाकी काढून टाकले होते, तर मोठ्या प्रमाणात कमी झालेल्या 15 मतदारसंघात टीएमसी कसं निवडून आलं? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. 2000 सालापासनं याद्या ठीक झालेल्या नाहीत पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुळामध्ये आपण जर बघितलं, 2000 सालापासनं याद्या ठीक झालेल्या नाहीत. 2004 साली एकदा SIR केलेला आहे. जे दर पाच वर्षांनी करायला पाहिजे समरी रिव्हिजन मुळे शहरांमधला हा प्रश्न आपण बघा, महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये हा प्रश्न नाही. ग्रामीण भागामध्ये वगळलेली मतं, न सापडलेली मतं यांची संख्या कमी आहे. पण शहरांमध्ये ती जास्त आहे कारण मायग्रेशन मोठ्या प्रमाणात आहे. शहरात आणि गावात दोन्ही ठिकाणी लोकांनी मतं ठेवली आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये प्रत्येकाला संधी आहे, राजकीय पक्षांना संधी आहे. जसं आम्ही त्याच्यामध्ये आमचे बीएलओ (BLO) तयार केले, तसं प्रत्येक पक्षाला त्यांनी सांगितलं. प्रत्येक पक्षाने कमी अधिक प्रमाणात दिलेत, पक्षांनी जाऊन हे करण्याची जरुरत आहे. मला असं वाटतं की या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभं करण्याच्या ऐवजी एकदा आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं असल्याचा सल्ला फडणवीस यांनी दिला आहे. दुष्काळावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, मुळातच आपण काल 265 तालुके हे दुष्काळग्रस्त जाहीर केलेले आहेत आणि या तालुक्यांमधली मदत ही सरसकट जाणार आहे. या संदर्भात ज्या तातडीच्या गोष्टी करायच्या आहेत त्याची काल आपण घोषणा केलेली आहे. 12 उपाययोजना ज्या तातडीच्या आहेत त्याला मान्यता पण दिलेली आहे आणि आपल्याला माहिती आहे की फर्स्ट ट्रिगरवर आता आपण या ठिकाणी हा आदेश काढलेला आहे.
Source link
काँग्रेसचा 'फेक नरेटिव्ह' उघडा पडला:राहुल गांधींना देशात 'अतिडावी' राजवट आणायचीय, CM देवेंद्र फडणवीसांचा घणाघाती आरोप