![]()
गणेश विसर्जन मिरवणूक, दर्शनासाठी पुणे शहरातील मध्यवर्ती भागात झालेल्या तुफान गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला. दि. २५ सप्टेंबर आणि २६ सप्टेंबर रोजी मध्यवर्ती भागातील वेगवेगळ्या रस्त्यांवर चोरट्यांनी नागरिकांना लक्ष्य करत मोबाईल, सोनसाखळ्या, मंगळसूत्र आणि पाकीट चोरी केली. याप्रकरणी फरासखाना आणि विश्रामबाग पोलिस ठाण्यात चोरीचे आतापर्यंत १३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सर्व १३ घटनांमध्ये मिळून एकूण साडेसहा लाखांचा ऐवज चोरीला गेला. यामध्ये १ मंगळसूत्र, १ मिनी मंगळसूत्र, ७ सोनसाखळ्या, ६ मोबाईल आणि २ हजार रुपयांच्या रोख रकमेचा समावेश आहे. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आणि मानाच्या गणपतींच्या दर्शनासाठी लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, बाजीराव रस्ता आणि कुमठेकर रस्त्यावर भाविकांची तुफान गर्दी झाली होती. याच गर्दीचा फायदा चोरट्यांनी घेतला. विविध भागांतील घटना अन दाखल तक्रारी – बेलबाग चौक : गर्दीचा फायदा घेऊन रामचंद्र गोपाळ गोधळकर (वय २०, रा. धायरी) यांचा ८ हजार रुपयांचा ‘रियलमी’ मोबाईल चोरट्याने लांबवला. २५ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. – छत्रपती शिवाजी महाराज रस्ता : ढोल-ताशा पथकाचे वादन पाहत असलेले श्रीनिवास धर्मापुरी शक्करी कोंडा (वय ३५, रा. येरवडा) यांच्या गळ्यातील १ लाख ६० हजार रुपयांची सोनसाखळी व लॉकेट पहाटे सव्वातीन वाजता चोरट्याने पळवले. – मंडई परिसर (बाबू गेणू मंडळ) : गर्दीत अर्पिता भाऊ गोरे (वय १७, रा. हडपसर) यांची ४० हजार ९४० रुपयांची सोनसाखळी, तर सायली संतोष भागवत (वय २६, रा. हडपसर) यांची ३७ हजार ७५७ रुपयांची सोनसाखळी चोरट्यांनी लांबवली. – लक्ष्मी रस्ता : गणपती चौकात ऐश्वर्या सुशांत शिंदे (वय ३२, रा. बाणेर) यांची ५० हजारांची सोनसाखळी चोरीस गेली, तर चित्रा चित्रपटगृहाजवळ चंदन सदानंद लोटेकर (वय ५०, रा. पुणे) यांच्या खिशातील २ हजारांची रोकड व पाकीट मारले गेले. – शनिवारवाडा खाऊ गल्ली : शिवम बाळासाहेब शिंदे (वय २०, रा. पिंपरी) आणि त्यांच्या मित्राचे असे एकूण २० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल चोरट्याने पळवले. – समाधान चौक : मुलचंद मिलजवळ गणपती दर्शनासाठी आलेले अभिषेक गिरीश गाडे (वय २९, रा. शिवणे) यांचा ५० हजार रुपयांचा ‘सॅमसंग’ मोबाईल दोन भामट्यांनी लांबवला.
Source link
गणेश विसर्जन मिरवणुकीत चोरट्यांनी सोनसाखळी, मोबाईल लांबवले:साडेसहा लाखांचा ऐवज चोरीला; फरासखाना, विश्रामबाग पोलिस ठाण्यात 13 गुन्हे दाखल