![]()
जिल्ह्यात मागील ५५ ते ६० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील मका, सोयाबीन, बाजरीसह कडधान्ये, भरडधान्ये व फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे संपूर्ण नाशिक जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली. संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे (पाटील) यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. जिल्ह्यातील काही पूर्वेकडील तालुके यापूर्वीच दुष्काळाच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत. मात्र उर्वरित तालुक्यांमध्येही दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांचे कौटुंबिक आर्थिक बजेट कोलमडले आहे.शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी, तसेच शेतकरी, शेतमजूर व कष्टकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, अशी मागणी करण्यात आली. मागील वर्षी अतिपावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र पीक विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. याप्रकरणी पंतप्रधान पीक विमा कार्यालयाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली. दोन दिवसांत नाशिक जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्ह्यात मोठ्या स्वरूपाचे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गजानन घोटेकर, मच्छिंद्र जाधव, वर्षा जाधव, अनिता कोल्हे, सोनंद दाते आदींसह पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
Source link
संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा:स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन;अन्यथा आंदोलन