![]()
“गजरे जरी फुलांचे या माळतात पोरी… का बंधने युगांची ह्या पाळतात पोरी? कर्जात गुंतलेल्या बापास वाचवाया, आगीसही सुखाने कवटाळतात पोरी…” कधी काळजाच्या तळाशी साचलेल्या वेदनेला शब्दांचे पंख फुटले, तर कधी बंडखोरीच्या ठिणग्यांनी सामाजिक वास्तवाचा अंधार उजळून निघाला. कुठे प्रेमाची हळुवार फुंकर होती, तर कुठे जगण्याच्या संघर्षाला भिडणारा पहाडी हुंकार… अशा आशयघन शब्दफुलांनी सावरगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल व एम. जी. पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाचा परिसर अक्षरशः बहरून गेला. निमित्त होते विद्यालयात आयोजित कविसंमेलनाचे. येथील नामांकित कवी लक्ष्मण बारहाते, शाहिरी गायक शरद शेजवळ, गझलकार सचिन साताळकर आणि साहित्य संमेलन गाजवलेले रतन पिंगट यांच्या कविता सादरीकरणाने विद्यालयीन वातावरणाला शब्द, सूर आणि संवेदनांची अनोखी किनार लाभली. कधी मंजुळ स्वरांनी मनाला गोंजारणाऱ्या, तर कधी पहाडी आवाजात अंतर्मनाला साद घालणाऱ्या कवितांनी विद्यार्थ्यांसह शिक्षकांच्या मनातही भावनांचे असंख्य तरंग उमटविले. त्यामुळे सावरगाव संकुलाची सकाळ साहित्याच्या सुगंधाने दरवळून गेली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डी. बी. नागरे होते. पर्यवेक्षक जी. एस. नागरे उपस्थित होते. दोन तास चाललेल्या या कविसंमेलनाला चिमुकल्यांसह सर्व विद्यार्थ्यांनी भरभरून दाद दिली.लोककलावंत शरद शेजवळ यांनी आपल्या पहाडी आवाजातून ‘दोनच राजे इथे जन्मले…’ या पोवाड्यासह वामनदादा कर्डक यांच्या गीतांनी विद्यार्थ्यांना खिळवून ठेवले. कवी सचिन साताळकर यांच्या गझल गायनाने विद्यार्थ्यांना नव्या साहित्यप्रकाराची आवड निर्माण झाली. “झाड व्याकूळ होते उन्हात चालणाऱ्या माणसाला पाहून झाडाला माहीत नसते त्याच्या हातात कुऱ्हाड आहे की पाणी…!” कवी लक्ष्मण बारहाते यांच्या आशयघन ओळींनी कविसंमेलन बहरत गेले. “पोरी धुतात धुणं आपल्याच नादात तळ्यात, मळ्यात, नदीवर, पाणवठ्यावर मात्र नाही सोडता येत त्यांना थरथरत्या प्रवाहावर..” मुलींचे भावविश्व वर्णन करणारी ही कविता रतन पिंगट यांनी सादर केली. वसंत विंचू यांनी आठवणीतल्या कविता सादर केल्या. सावरगाव विद्यालयाच्या निसर्गसंपन्न वातावरणात, शिस्तप्रिय विद्यार्थ्यांसमोर, भौतिक सुविधांनी युक्त परिसरात आणि शाळेप्रती आदरभाव जपणाऱ्या शिक्षकांच्या समवेत कविता सादरीकरणाचा वेगळा आनंद मिळाल्याची भावना कवी बारहाते, शेजवळ, पिंगट यांनी व्यक्त केली. लक्ष्मण बारहाते यांनी सूत्रसंचाल केले.
Source link
काव्य, गझल, पोवाड्यातून सामाजिक वास्तवाचे दर्शन:सावरगाव विद्यालयात कविता सादरीकरणातून विद्यार्थ्यांना साहित्याची अनुभूती