![]()
अकोट तालुक्यातील संतनगरी म्हणून प्रख्यात असलेल्या मुंडगाव येथील गावातील कचरा हा चंद्रीका नदीच्या काठावर असलेल्या वणी वारुळा-मुंडगाव रस्त्यावर टाकण्यात येतो. या ठिकाणी लाखो रुपये खर्च करून कचरा व्यवस्थापनासाठी खड्डे बांधण्यात आले. मात्र कचरा खड्ड्यांमध्ये न टाकता तो थेट रस्त्यावर टाकण्यात येत आहे. या प्रकाराकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असून, या रस्त्याने ये-जा करणारे प्रवासी व गावातील नागरिक त्रस्त झाले आहेत. गावातील कचरा टाकण्यासाठी लाखो रुपयांच्या निधीतून बांधलेले खड्डे एक प्रकारे शोभेची वास्तू बनले आहेत. उघड्यावर टाकण्यात येत असलेल्या कचऱ्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्यांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. सकाळी फिरायला जाणाऱ्यांनासुद्धा येथील दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. तसेच मुंडगावात रस्त्यावरून भाविक-भक्त येतात. दर गुरुवारी जास्तीत जास्त भाविक-भक्त दर्शनासाठी येथे येतात. त्यांनासुद्धा मुंडगावात आगमन होताच, या दुर्गंधीचा सामना करत मंदिरात दर्शनासाठी जावे लागते. प्रसिद्ध देवस्थान असल्याने या ठिकाणी स्वच्छता ठेवण्याबाबत ग्रामपंचायतीकडून कोणत्याच उपाययोजना होताना दिसून येत नाहीत. ग्रामपंचायतने कचरा व्यवस्थापनासाठी खड्डे बांधले. मात्र त्याचा वापरच होत नसल्याने हा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी घंटागाडीसुद्धा देण्यात आल्या आहेत. घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्यासाठीची घंटागाडी ग्रामपंचायतने गहाळ केल्यामुळे येथील नागरिक रस्त्यावरच कचरा टाकत असल्याचे चित्र आहे. घंटागाडी बंद असल्याने कचऱ्याचा प्रश्न उद्भवत मुंडगाव-वणी वारुळा रस्त्यावर चंद्रीका नदीजवळ असलेल्या स्मशानभूमीजवळ मोठ्या प्रमाणात कचरा व घाण टाकण्यात येत आहे. गावकऱ्यांनी याठिकाणी कचरा व घाण न टाकता घनकचरा व्यवस्थापनाच्या टाक्यात कचरा जाळून टाकावा. आमच्याकडे तशी व्यवस्था नाही. आमची घंटागाडी बंद असल्याने हा प्रश्न उद्भवत आहे. -सैय्यद नजाकत , ग्रामसेवक, ग्रामपंचायत मुंडगाव कचऱ्याची विल्हेवाट लावा आम्ही दररोज सकाळी व संध्याकाळी मॉर्निंग वॉकसाठी वणी वारुळाकडे जात असताना येथील रस्त्यावर असलेल्या कचरा व घाणीमुळे प्रचंड दुर्गंधी सुटते. ग्रामपंचायतने या कचऱ्याची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. दुर्गंधीमुळे येणाऱ्या-जाणाऱ्यांना खूप त्रास होतो. – प्रा. मनोहर थारकर , मुंडगाव हवेमुळे कचरा उडून जातो रस्त्याच्या कडेला पडून असलेल्या कचऱ्यांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. उघड्यावर टाकण्यात येणारा कचरा हवेमुळे उडून जातो. तेथे असलेल्या कचरा व्यवस्थापन खड्ड्यात कचरा टाकण्यात यावा. कचरा जाळण्यात यावा. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
Source link
उपाययोजना करण्याची मागणी:मुंडगावातील कचरा रस्त्यावर; दुर्गंधीमुळे नागरिक, प्रवासी त्रस्त, ग्रामपंचायत प्रशासनाचे समस्येकडे दुर्लक्ष