![]()
गणेशोत्सवानिमित्त करमाळा शहरातील मानाचा गणपती म्हणून ओळख असलेल्या किल्ला वेस येथील लोकप्रिय हनुमान तरुण मंडळाच्या वतीने यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा केला जात आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर जनजागृती
.
या देखाव्यात सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कार्यशैलीवर आधारित विविध प्रसंग सादर करण्यात आले. विशेषतः भेसळयुक्त पदार्थांविरोधात करण्यात आलेल्या कारवाईचा प्रसंग प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. सामाजिक प्रश्न नागरिकांसमोर मांडून त्यातून जनजागृती व्हावी, हा या देखाव्यामागील मुख्य उद्देश होता. तुकाराम मुंढे यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन मंडळाच्या सदस्यांनी हा संपूर्ण देखावा स्वतः लिहून तयार केला आहे. मंडळातील सदस्यांनीच विविध भूमिका साकारत हा देखावा जिवंत केला.
गणेशोत्सव केवळ धार्मिक उत्सव न राहता त्यातून सामाजिक संदेशही दिला जावा, या उद्देशाने हनुमान तरुण मंडळाकडून दरवर्षी विविध सामाजिक विषयांवर देखावे आणि उपक्रम राबविले जातात. यंदाच्या देखाव्यातून कर्तव्य, प्रामाणिकपणा आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश देण्यात आला.
हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या जिवंत देखाव्याचे उद्घाटन करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे तसेच पत्रकार बांधवांच्या हस्ते करण्यात आले. श्री गणेशाची आरती करमाळा तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली. यावेळी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार, गणेशभक्त आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्यासह पत्रकार संघाचे अध्यक्ष शीतलकुमार मोटे, विशाल घोलप, आशपाक सय्यद, प्रशांत भोसले, अविनाश जोशी, हर्षवर्धन गाडे, अंगद भांडवलकर यांच्यासह नागरिकांनी देखावा पाहिला.
सामाजिक संदेश देणे कौतुकास्पद : ठोकडे किल्ला वेस येथील हनुमान तरुण मंडळाने गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक विषयावर जनजागृती करणारा जिवंत देखावा सादर केला आहे. ‘अभंग गाथा ते कर्तव्य गाथा’ या विषयातून नागरिकांपर्यंत सामाजिक संदेश पोहोचविण्याचा मंडळाचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. गणेशोत्सवासारख्या उत्सवातून समाजातील महत्त्वाचे प्रश्न मांडून नागरिकांमध्ये जागृती निर्माण होणे गरजेचे आहे. मंडळाच्या सदस्यांनी स्वतः देखावा तयार करून तो सादर केला, ही विशेष बाब आहे. नागरिकांनीही प्रोत्साहन द्यावे.