Headlines

प्रा. डॉ. मंगेश कराड यांना शैक्षणिक योगदानासाठी 'मराठवाडा रत्न' पुरस्कार:परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ठाण्यात प्रदान




शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल एमआयटी आर्ट, डिझाइन अँड टेक्नॉलॉजी (एमआयटी एडीटी) विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड यांना ‘मराठवाडा रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मराठवाडा जनविकास परिषद, ठाणे यांच्या वतीने आयोजित मराठवाडा मुक्तिसंग्राम सोहळ्यात राम गणेश गडकरी रंगायतन, तलावपाळी येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला. मराठवाडा जनविकास परिषदेचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे आणि वरिष्ठ उपाध्यक्ष नितीन कदम यांनी प्रा. डॉ. कराड यांचा गौरव केला. मराठवाडा जनविकास परिषद गेल्या १७ वर्षांपासून मराठवाड्यातील नागरिकांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवत आहे. संस्थेच्या वतीने दरवर्षी मराठवाडा बहुभाषिक दिन सोहळ्याचे आयोजन केले जाते. यंदा शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत प्रा. डॉ. कराड यांची ‘मराठवाडा रत्न’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. पुरस्काराबद्दल बोलताना प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी सांगितले की, मराठवाडा ही केवळ भौगोलिक भूमी नसून त्याग, पराक्रम, अध्यात्म आणि संघर्षाचा ज्वलंत इतिहास असलेली भूमी आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय जडणघडणीत मराठवाड्याचे योगदान अतुलनीय आहे. मराठवाड्याचा पुत्र म्हणून ‘मराठवाडा रत्न’ हा सन्मान मिळणे ही अभिमानाची बाब आहे. माईर्स एमआयटी शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शनाच्या बळावर एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या शैक्षणिक कार्याला मिळालेली ही पुरस्काररूपी पावती आहे, असेही त्यांनी म्हटले. शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल मिळालेला हा पुरस्कार केवळ वैयक्तिक सन्मान नसून कराड कुटुंबीय तसेच एमआयटी एडीटी विद्यापीठातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा गौरव असल्याची भावना प्रा. डॉ. कराड यांनी यावेळी व्यक्त केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *