![]()
केंद्र सरकारने मांडलेल्या महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून भाजपने मुंबईतील वरळीत काढलेल्या मोर्चामुळे संध्याकाळच्या वेळी प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली, ज्याचा मोठा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसला. याच गदारोळात एका संतापलेल्या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, त्यात तिने चक्क मंत्री गिरीश महाजन आणि उपस्थित पोलिसांना सडेतोड शब्दांत सुनावले आहे. या घटनेनंतर संबंधित महिलेला काही स्तरांतून ट्रोल केले जात असले, तरी प्रत्यक्षात वाहतूक कोंडीत अडकलेल्या आपल्या लहान मुलाच्या काळजीपोटी त्या महिलेचा संताप अनावर झाला होता. आपल्या लेकरासाठी कोणत्याही दबावाला बळी न पडता ती महिला ज्या निडरपणे व्यवस्थेला भिडली, त्याचीच आता सर्वत्र चर्चा रंगत आहे. वरळी येथील जांबोरी मैदानातून मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा एनएससीआय डोमपर्यंत नेण्यात आला. मात्र या मधल्या काळात रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. तसेच कामाचा दिवस असल्याने कामावर जाणारे लोक तसेच शाळेतून घरी येणाऱ्या मुलांच्या बसेस सुद्धा सुरू होते. त्यात वाहतूक कोंडी झाल्याने आपल्या मुलांची बस निघून तर नाही गेली हे पाहण्यासाठी पालक रस्त्यावर आले होते. त्यात या महिला देखील होत्या. मुलासाठी काळजीने व्याकूळ झालेल्या महिलेचा संयम सुटला वरळी परिसरातील या वाहतूक कोंडीत संबंधित महिला आपल्या मुलाला घेण्यासाठी आली असताना अडकून पडली होती. भाजपच्या मोर्चामुळे रस्ते पूर्णपणे जाम झाले होते आणि मागील एक तासापासून तिला मुलाची स्कूल बस शोधता येत नव्हती. आपला मुलगा नक्की कुठे आहे आणि बस पुढे तर निघून गेली नाही ना? या भीतीने आणि मुलाच्या सुरक्षिततेच्या काळजीने व्याकुळ झाल्यामुळेच त्या महिलेचा संयम सुटला. आपल्या लेकरासाठी असलेल्या याच तगमगीतून तिचा राग अनावर झाला आणि तिने थेट व्यवस्थेला जाब विचारला. महिलेकडून आधी मदतीसाठी दाद, पण प्रतिसाद मिळाला नाही आपल्या मुलाला शाळेतून नेण्यासाठी आलेल्या या महिलेचा संताप निव्वळ राजकीय नव्हता, तर तो एका काळजीत असलेल्या माऊलीचा आक्रोश होता. तासाभरापासून वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे तिला आपल्या मुलाची स्कूल बस दिसत नव्हती, ज्यामुळे ती प्रचंड व्याकुळ झाली होती. तिने सुरुवातीला पोलिसांकडे आणि मोर्चाच्या आयोजकांकडे जाऊन मदतीसाठी दाद मागितली, आपले गाऱ्हाणे मांडले. मात्र कोणाकडूनही योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून तिचा संयम सुटला. आपल्या लेकराच्या सुरक्षिततेसाठी व्याकुळ झालेली ही माता मग कोणालाही न जुमानता थेट व्यवस्थेला भिडली आणि तिचा हा रोख थेट समोर असलेल्या मंत्र्यांच्या दिशेने वळला. मंत्री गिरीश महाजनांना धरले धारेवर या महिलेने मंत्री गिरीश महाजन यांना अत्यंत आक्रमकपणे जाब विचारला की, “तुमचं हे नेमकं काय चाललंय? इथून निघून जा, तुमच्या मोर्चामुळे शेकडो लोक अडकून पडले आहेत.” विरोध करायचा असेल तर तो मैदानात करा, रस्त्यावर वाहतूक कोंडी करून सर्वसामान्यांना वेठीस का धरता? असा सवाल तिने यावेळी उपस्थित केला. केवळ मंत्र्यांनाच नाही, तर तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनाही तिने धारेवर धरले. या महिलेचे हे रौद्रवतार सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया दरम्यान, महिलेच्या संतापवर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, वाहतूक कोडींमुळे त्या महिला वैतागलेल्या होत्या. मोर्चामुळे थोड्या फार प्रमाणात वाहतूक कोंडी आणि सामान्यांना गैरसोय होत असते. मात्र, त्यावेळी एक भगिनी महिला तिथे अत्यंत वाट्टेल तशा भाषेत बोलत होत्या. त्या महिला पोलिस भगिनींसोबतही अत्यंत वाईट भाषेत बोलत होत्या. मी त्यांना समजावत होतो की आम्ही 10-15 मिनिटांत निघून जाऊ. त्या महिलेने बाटली फेकून मारली, ज्या भाषेचा वापर केला ते चुकीचे होते, असे महाजन म्हणाले. तसेच पुढच्यावेळी यासंदर्भात आम्ही काळजी घेऊ की कुणाला अशी गैरसोय होणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. संतप्त महिलेचे व्हिडिओ पाहा
Source link
मुलाच्या काळजीपोटी महिलेचा संयम सुटला:मंत्री गिरीश महाजनांना सुनावणाऱ्या महिलेची दुसरी बाजू, संतापण्याचे नेमके कारण काय?