Headlines

लातूरच्या भंगार बाजारात आगीचे तांडव:वायरच्या दुकानासह 4 ते 6 दुकाने जळून खाक, सुदैवाने जीवितहानी नाही




लातूर शहरातील स्क्रॅप मार्केट (भंगार बाजार) परिसरात सोमवारी एका वायरच्या दुकानाला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. शॉर्टसर्किटमुळे मोठा स्फोट होऊन ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. आगीची तीव्रता एवढी प्रचंड होती की, बघता बघता तिने आजूबाजूच्या चार ते सहा दुकानांनाही आपल्या कवेत घेतले. दुकानांमध्ये वायर आणि इतर ज्वलनशील स्क्रॅप साहित्य मोठ्या प्रमाणावर असल्याने आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले असून, अधिकारी आणि जवान आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. एकीकडे आगीचा भडका आणि दुसरीकडे घटनास्थळी बघ्यांची उडालेली मोठी गर्दी, अशा दुहेरी संकटाचा सामना अग्निशमन दलाला करावा लागत आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासनही घटनास्थळी तातडीने दाखल झाले आहे. आगीचा भडका परिसरातील इतर दुकानांपर्यंत पोहोचू नये यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. तसेच, आगीची व्याप्ती पाहता ती पूर्णपणे नियंत्रणात आणण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातून आणखी अग्निशमन यंत्रणा मागवण्याची शक्यता आहे. सुदैवाने या भीषण घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या दुकानांमधील साहित्य जळून खाक झाले आहे. आग पूर्णपणे विझल्यानंतर आणि कूलिंग प्रक्रिया झाल्यानंतरच नुकसानीचा नेमका आकडा समोर येऊ शकेल. मात्र, बाधित व्यापाऱ्यांच्या प्राथमिक अंदाजानुसार यात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेवर आमदार अभिमन्यू पवार यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, लातूर शहरातील स्क्रॅप मार्केट रस्त्यावरील गोरक्षण संस्था परिसरातील गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. घटनेची माहिती मिळताच लातूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी होऊ नये, तसेच आग लवकरात लवकर नियंत्रणात यावी, हीच अपेक्षा. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *