Headlines

सणासुदीच्या काळात अन्नभेसळीविरोधात FDA ची मोठी मोहीम:राज्यभर 50 टन साठा जप्त, 30 आस्थापनांचे परवाने निलंबित




गणेशोत्सव आणि गौराईच्या सणाच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांच्या गुणवत्ता व स्वच्छतेबाबत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभर तपासणी मोहीम राबवली. या कारवाईत विविध जिल्ह्यांमधील हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे, क्लब, बेकरी आणि इतर अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली. नियमांचे उल्लंघन आढळलेल्या आस्थापनांवर कारवाई करत राज्यातील 30 अन्न परवाने किंवा नोंदणी प्रमाणपत्रे निलंबित करण्यात आली आहेत. याशिवाय 50,601.78 किलो म्हणजेच सुमारे 50.60 टन अन्नसाठा जप्त करण्यात आला असून, त्याची बाजारातील किंमत सुमारे 1 कोटी 19 लाख रुपये असल्याची माहिती प्रशासनाने दिली. सणासुदीच्या काळात मिठाई, फरसाण, नमकीन, दूध व दुग्धजन्य पदार्थांसह विविध खाद्यपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. या पार्श्वभूमीवर भेसळ, निकृष्ट दर्जाचे पदार्थ आणि अस्वच्छ परिस्थितीत अन्न तयार करण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी FDA कडून विशेष मोहीम राबवण्यात आली. खाद्यतेल, तांदूळ, ड्रायफ्रूट्स, चहा, मसाले, सॉस, नूडल्स, वेफर्स यांसह अन्य अन्नपदार्थांचीही तपासणी करण्यात आली. मुंबईत सर्वाधिक 13 परवाने निलंबित या मोहिमेत राज्यातील विविध विभागांमध्ये कारवाई करण्यात आली. मुंबई विभागातील 13 आस्थापनांचे परवाने किंवा नोंदणी प्रमाणपत्रे निलंबित करण्यात आली आहेत. त्यानंतर पुणे विभागातील 8, कोकण विभागातील 6 आणि संभाजीनगर विभागातील 3 अन्न आस्थापनांवर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली. हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबा, क्लब, बेकरी यांसारख्या आस्थापनांमध्ये स्वच्छता, अन्न साठवणूक, कच्चे व तयार अन्न वेगळे ठेवणे, कर्मचाऱ्यांनी आवश्यक सुरक्षात्मक साधनांचा वापर करणे आदी नियमांचे पालन होत आहे की नाही, याची तपासणी करण्यात आली. 26 आस्थापनांवर कारवाई; 22 एफआयआर, 30 जणांना अटक FDAच्या कारवाईदरम्यान 26 आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये सुमारे 30.93 लाख रुपयांचा प्रतिबंधित पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. कारवाईदरम्यान 22 एफआयआर दाखल करण्यात आले असून 30 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. याशिवाय नियमांचे गंभीर उल्लंघन करणारी 3 आस्थापने सील करण्यात आली, तर 3 वाहनेही जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईमुळे सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये प्रशासनाच्या तपासणीचा धसका निर्माण झाला आहे. काळबादेवीतील आस्थापनात गंभीर अस्वच्छता मुंबईतील काळबादेवी परिसरातील मे. कयानी अँड कंपनी या आस्थापनाची 27 सप्टेंबर रोजी तपासणी करण्यात आली. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र’ या धोरणांतर्गत ही कारवाई करण्यात आली. तपासणीदरम्यान अन्न तयार करण्याच्या आणि साठवणुकीच्या ठिकाणी गंभीर स्वच्छता त्रुटी आढळल्याचे प्रशासनाने सांगितले. परिसरात मांजर व उंदरांची विष्ठा, जिवंत व मृत झुरळे आढळून आली. रेफ्रिजरेटरमध्ये मोठ्या प्रमाणात रक्त साचलेले होते, तर प्रक्रिया विभागात उघडे सांडपाणी मॅनहोल आढळले. याशिवाय अन्नपदार्थ जमिनीवर ठेवणे, कच्च्या पिठावर छापील वर्तमानपत्राचा वापर करणे, कर्मचाऱ्यांकडून आवश्यक स्वच्छता आणि PPEचा वापर न करणे तसेच कच्चे आणि तयार अन्नपदार्थ योग्य पद्धतीने वेगळे न ठेवणे, अशा त्रुटीही निदर्शनास आल्याची माहिती FDAने दिली. लोअर परेलमधील सबवेचा परवाना निलंबित लोअर परेल येथील मे. एव्हरसब इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (सबवे) या आस्थापनावरही FDA ने कारवाई केली. एआय पोर्टलवर प्राप्त झालेल्या तक्रारीच्या आधारे 26 सप्टेंबर रोजी अन्न सुरक्षा अधिकारी रुचिका संजय सूर्यवंशी यांनी या आस्थापनाची तपासणी केली. तपासणीमध्ये अन्न आस्थापनांसाठी लागू असलेल्या अनुसूची 4 मधील स्वच्छता आणि आरोग्यविषयक निकषांचे गंभीर उल्लंघन आढळल्याचे प्रशासनाने नमूद केले. त्यानंतर संबंधित आस्थापनाचा अन्न परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला. सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांची वाढती मागणी लक्षात घेता, नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावे यासाठी तपासणी मोहीम पुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. हेही वाचा…. MPSC च्या 3 महत्त्वाच्या परीक्षा पुढे ढकलल्या:राज्यसेवा मुख्य परीक्षेची 3 ऑक्टोबरची परीक्षा स्थगित, नवीन तारखा लवकरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) ऑक्टोबरमध्ये नियोजित असलेल्या तीन महत्त्वाच्या मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षा 2026 आणि महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2026 यांचा समावेश आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 3 ऑक्टोबर 2026 पासून सुरू होणार होती. आयोगाच्या निर्णयामुळे या परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला असला, तरी सुधारित वेळापत्रकाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *