Headlines

बारामतीत दोन वृद्ध महिलांची गळा चिरून हत्या:घराच्या ओसरीत झोपलेल्या असताना मध्यरात्री हल्ला; दागिने लुटल्याचा पोलिसांचा अंदाज




बारामती तालुक्यातील शेरेवाडी (बाबुर्डी) गावात घराबाहेरील ओसरीत झोपलेल्या दोन वृद्ध महिलांची अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी मध्यरात्री घडली. इंदुमती मारुती लडकत (७५) आणि कृष्णाबाई कुंडलिक लडकत (६५) अशी मृत महिलांची नावे आहेत. मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. प्राथमिक तपासात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लुटण्यात आल्याचे समोर आल्याने चोरीच्या उद्देशातून हा दुहेरी हत्याकांड झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदुमती लडकत या शेरेवाडी येथील आपल्या घरी राहत होत्या. त्या बाबुर्डी गावच्या माजी सरपंच होत्या. त्यांना दोन मुले असून एक मुलगा बारामती येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहे, तर दुसरा बंगळुरू येथे नोकरीला आहे. कृष्णाबाई लडकत या इंदुमती यांच्या शेजारी राहत होत्या. इंदुमती यांना सोबत मिळावे म्हणून त्या अनेकदा रात्री त्यांच्या घरी झोपण्यासाठी येत असत. सोमवारी रात्रीही दोघी घराबाहेरील ओसरीत झोपल्या होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्ती घरात शिरली. त्यानंतर दोन्ही महिलांवर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांचा गळा चिरण्यात आला. त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र काढून नेण्यात आल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात आढळले आहे. महिलांनी प्रतिकार केला असण्याची शक्यताही तपासली जात आहे. घरातील दरवाजा आणि कपाटे उघडी आढळून आली असून, मंगळसूत्रांव्यतिरिक्त अन्य कोणती वस्तू किंवा दागिने चोरीला गेले आहेत का, याचा तपास सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच सुपा पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक पथक, ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, संशयितांची ये-जा तसेच घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे. कृष्णाबाई यांचा मुलगा शेती करतो असून तो घटनास्थळी उपस्थित होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *