Headlines

कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरण मार्च 2027 पर्यंत पूर्ण करा:आयुक्तांचे निर्देश; 84 मीटर रस्ता 2028 पर्यंत, उड्डाणपूल डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण होणार




कात्रज-कोंढवा परिसरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या कात्रज-कोंढवा रस्ता तसेच कात्रज चौकातील उड्डाणपुलाच्या विकासकामांचा आज पाहणी करून आढावा घेण्यात आला. महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, आमदार योगेश टिळेकर, सभागृह नेते गणेश बिडकर यांच्यासह महापालिका, विशेष भूसंपादन कार्यालय आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. कात्रज-कोंढवा रस्त्याच्या ५० मीटर रुंदीकरणाचे काम मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्त नवलकिशोर राम यांनी संबंधित यंत्रणांना दिले. तसेच रस्त्याच्या प्रस्तावित ८४ मीटर विकसनासाठी आवश्यक भूसंपादनाची कार्यवाही आणि निधीची तरतूद उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ८४ मीटर रस्त्याचे विकसन मार्च २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यावेळी रस्त्याच्या कामातील विविध अडथळ्यांचा आढावा घेतला. सर्विस रस्त्याचे बहुतांश काम पूर्णत्वास आले असून, ग्रेड सेपरेटरच्या कामासाठी अडथळा ठरणारे विद्युत पोल आणि ट्रान्सफॉर्मर तातडीने हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच रखडलेल्या भूसंपादनाच्या प्रकरणांमध्ये संबंधित जागामालकांशी संपर्क साधून एक महिन्यात संमती घेऊन रस्त्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यावेळी मुख्य अभियंता (पथ विभाग) बनकर, उपायुक्त निखील मोरे, मुख्य अभियंता (विद्युत विभाग) श्रीमती शेकटकर यांच्यासह महापालिकेचे संबंधित अधिकारी, विशेष भूसंपादन कार्यालयाचे अधिकारी आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कात्रज चौकातील उड्डाणपुलाचे काम डिसेंबर २०२६ अखेरपर्यंत पूर्ण होणार कात्रज चौकातील उड्डाणपुलाचे कामही वेगाने सुरू असून, डिसेंबर २०२६ अखेरपर्यंत उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रुती नाईक यांनी स्पष्ट केले. सभागृह नेते गणेश बिडकर म्हणाले,“कात्रज-कोंढवा रस्त्याच्या विकासकामातील अडथळे दूर करून कामाला गती देण्यावर आजच्या पाहणीत भर देण्यात आला. रखडलेले भूसंपादन एक महिन्यात पूर्ण करून रस्त्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याची सूचना करण्यात आली आली आहे. वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून निर्धारित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत”.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *