![]()
पुणे महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून बनावट नियुक्तीपत्रे, ओळखपत्रे व अन्य कागदपत्रांच्या आधारे कथित भरती गैरव्यवहार केल्याप्रकरणी जेजुरी येथील श्री मार्तंड देव संस्थानचा विश्वस्त राजेंद्र बबन खेडेकर याला शिवाजीनगर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. अटकेनंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने खेडेकर याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पुणे महापालिकेतील कथित बनावट भरती प्रकरणात खेडेकरसह महापालिकेच्या शिक्षण विभागातील शिपाई शिवानंद बाळासाहेब पाटील आणि नमिता गोवर्धन बनसोडे यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अधीक्षकांनी याबाबत फिर्याद दिली होती. तक्रारीनुसार, महापालिकेत विविध पदांवर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून बेरोजगारांकडून मोठ्या रकमा घेण्यात आल्याचा आरोप आहे. त्यासाठी महापालिकेचे बनावट लेटरहेड, शिक्के आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर करून नियुक्तीपत्रे तयार करण्यात आली. उमेदवारांना ओळखपत्रे, सेवा पुस्तिका, वैद्यकीय प्रमाणपत्रे तसेच पगाराच्या पावत्याही देण्यात आल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. काही उमेदवारांच्या खात्यात पगार जमा झाल्याचे भासविल्याचाही आरोप आहे. या प्रकरणात १४ पेक्षा अधिक व्यक्तींना बनावट नियुक्तीपत्रे देऊन जवळपास पावणेतीन कोटी रुपयांहून अधिक रक्कम उकळल्याचा तपासातील प्राथमिक दावा यापूर्वी समोर आला आहे. सुरुवातीच्या तक्रारीत मात्र ४५ लाख रुपयांच्या फसवणुकीचा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता तपास यंत्रणेकडून व्यक्त करण्यात आली आहे. खेडेकरने यापूर्वी आपल्यावरील आरोप फेटाळून लावत आपणच या प्रकरणातील तक्रारदार असल्याचा दावा केला होता. आर्थिक व्यवहार, बनावट कागदपत्रे किंवा नियुक्ती प्रक्रियेशी आपला संबंध नसल्याचे त्याने स्पष्ट केले होते. दरम्यान, त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने ऑगस्टमध्ये फेटाळला होता. आता पोलिस कोठडीत खेडेकरची चौकशी करून बनावट कागदपत्रे तयार करण्यामागील सूत्रधार, आर्थिक व्यवहार आणि या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या अन्य व्यक्तींची माहिती घेण्यात येणार आहे.
Source link
बनावट भरती घोटाळ्यात जेजुरी देवस्थानचा विश्वस्त राजेंद्र खेडेकर अटकेत:शिवाजीनगर पोलिसांनी केली कारवाई, न्यायालयाकडून पाच दिवसांची पोलिस कोठडी