Headlines

ठाण्यात ठाकरे गटाच्या विभागप्रमुखाची गोळ्या झाडून हत्या:पूर्णेकर कुटुंबीयांचे माजी महापौरांवर गंभीर आरोप, घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर




ठाण्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची मंगळवारी रात्री गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे ठाण्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मानपाडा परिसरातील क्लस्टर डेव्हलपमेंट आणि राजकीय वर्चस्वाच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त होत असून, पूर्णेकर कुटुंबीयांनी ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर या हत्येचे सूत्रधार असल्याचा गंभीर आरोप केला आहे. नेमके काय घडले? प्रदीप पूर्णेकर यांचे बंधू जयनाथ पूर्णेकर यांनी घटनेचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. “मंगळवारी रात्री आम्ही नवरात्रौत्सवासाठी परिसरात वर्गणी गोळा करत होतो. त्यावेळी प्रदीप त्याच्या कार्यालयात बसला होता. रात्री ९ वाजून ३२ मिनिटांच्या सुमारास काही अज्ञात इसम त्याच्या कार्यालयात आले आणि त्यांनी पिस्तुलातून सात राऊंड फायर केले. त्यातील दोन गोळ्या प्रदीपला लागल्या, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला,” अशी माहिती जयनाथ यांनी दिली. ‘ड्रग्ज माफियांचा वापर करून हत्या’ जयनाथ पूर्णेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप नेहमीच समाजहितासाठी आणि विशेषतः परिसरातील ड्रग्ज विक्रेत्यांविरोधात काम करत होता. “आपल्या भागात ड्रग्ज विकले जात असल्याचे समजताच तो अनेकदा एकटाच रात्री-अपरात्री तिकडे जायचा. त्याला अनेक धमक्याही आल्या होत्या. या हत्येमागे राजेंद्र शिंदे आणि मिनाक्षी शिंदे यांच्याशी असलेला राजकीय वाद आहे. हल्ला करणारे आणि राजेंद्र शिंदे यांची एका इमारतीत मिटिंग झाल्याचा माझा आरोप आहे,” असे जयनाथ यांनी स्पष्ट केले. गणेशोत्सवापासूनच सुरू होती रेकी या हत्येचा कट खूप आधीपासून रचला गेल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. जयनाथ यांनी सांगितले की, “हल्लेखोरांशी प्रदीपचा कोणताही वैयक्तिक वाद नव्हता. एखाद्या मोठ्या व्यक्तीचा राजकीय वरदहस्त असल्याशिवाय कोणी एवढी मोठी हिंमत करणार नाही. गणपतीच्या काळातच त्यांनी इथे येऊन रेकी केली होती आणि ते योग्य संधीच्या शोधात होते. मी प्रदीपला अनेकदा बजावले होते की, ड्रग्ज विक्रेत्यांचा वापर करून हे लोक काहीही करू शकतात, पण काल तीन जण आले आणि त्यांनी डाव साधला.” मनोरमा नगरमध्ये कडकडीत बंद हत्येच्या घटनेनंतर मनोरमा नगर परिसरात तणावपूर्ण शांतता असून, बुधवारी या भागात कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे. दुकाने आणि परिसरातील तीन शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. प्रदीप पूर्णेकर यांना मानणारा मोठा वर्ग या भागात आहे. पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, हल्लेखोरांच्या शोधासाठी तब्बल नऊ पथके रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान, प्रदीप पूर्णेकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे.जे. रुग्णालयात ठेवण्यात आला असून, जोपर्यंत आरोपींना बेड्या ठोकल्या जात नाहीत, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा कुटुंबीयांनी घेतल्याने पोलिसांसमोरील आव्हान वाढले आहे. हेही वाचा.. ठाण्यात ठाकरे गटाच्या विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्यावर गोळीबार: दोन राऊंड फायर, उपचारादरम्यान मृत्यू ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप (बाळा) पूर्णेकर यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. मानपाडा परिसरातील गणेश नगर येथील त्यांच्या कार्यालयात अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात पूर्णेकर गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *