![]()
मांत्रिक विधी आणि जादूटोण्याच्या साहाय्याने ‘पैशांचा पाऊस’ पाडण्याचे अमिष दाखवून अंधश्रद्धेतून नागरिकांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या एका सराईत आंतरजिल्हा टोळीचा अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील बारामती येथील तिघांना बेड्या ठोकल्या असून, त्यांच्या ताब्यातून 500 रुपयांच्या तब्बल 18 हजार 419 बनावट नोटा, म्हणजेच 92 लाख 9 हजार 500 रुपयांचे बनावट चलन जप्त केले आहे. आरोपींकडून महागडी कार, मोबाईल फोन आणि बनावट नोटांसाठी लागणारे कोरे कागद असा एकूण 1 कोटी 3 लाख 74 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गोपनीय माहितीवरून मध्यरात्री छापा अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली होती की, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका घरात मोठ्या प्रमाणावर बनावट नोटांचा साठा लपवून ठेवण्यात आला आहे. या माहितीची खातरजमा झाल्यानंतर पोलीस पथकाने तातडीने सापळा रचून गणेश शेवाळे याच्या घरावर अचानक छापा टाकला. पोलिसांच्या पथकाने घराची कसून झडती घेतली असता, जिन्याखालील अंधाऱ्या कोपऱ्यात एका पिशवीमध्ये 500 रुपयांच्या नोटांची थप्पी आढळली. 18 हजारांहून अधिक बनावट नोटा प्राथमिक तपासणीत या सर्व नोटा हुबेहूब खऱ्यासारख्या दिसणाऱ्या मात्र बनावट असल्याचे निष्पन्न झाले. एकूण 18,419 नोटा (मूल्य: 92,09,500 रुपये) तसेच नोटांच्या आकाराचे कोरे कागदाचे बंडल घटनास्थळावरून जप्त करण्यात आले. बारामतीचे तीन आरोपी जेरबंद; 1 कोटी 3 लाखांचा मुद्देमाल हस्तगत पोलिसांनी घटनास्थळावरून बारामती येथील तिघा संशयितांना ताब्यात घेतले. गणेश दिलीप शेवाळे (वय 33 वर्षे), सुमित विकास चंदनशिवे (वय 25 वर्षे), सुरज वसंत कांबळे (वय 27 वर्षे) या आरोपींच्या ताब्यातून बनावट नोटांशिवाय 5 महागडे स्मार्टफोन, बनावट नोटा बनवण्यासाठी लागणारे विशेष कागद आणि गुन्ह्यात वापरलेली ‘व्हॉक्सवॅगन’ कंपनीची चारचाकी कार असा एकूण 1 कोटी 3 लाख 74 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अंधश्रद्धेतून ‘पैशांचा पाऊस’ पाडण्याची क्लृप्ती पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी केली असता अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपींनी सामान्य नागरिकांना झटपट श्रीमंत होण्याचे स्वप्न दाखवून “आम्ही मांत्रिक शक्तीने पैशांचा पाऊस पाडतो,” अशी थाप मारली होती. नागरिकांच्या मनातील लोभ आणि अंधश्रद्धेचा फायदा घेऊन, सुरुवातीला त्यांना जादूटोण्याने पैसे दुप्पट झाल्याचा भास घडवून आणण्यासाठी या बनावट नोटांचे बंडल दाखवले जात होते. पैशांचा पाऊस पाडण्याच्या पूजाविधीसाठी नागरिकांकडून लाखो रुपयांचे खरे चलन उकळून त्या बदल्यात त्यांना बनावट नोटांची थप्पी देऊन फसवणूक केली जात होती. तीन साथीदार फरार; मुख्य सूत्रधारांचा शोध सुरू या गुन्ह्यात आणखी तिघांचा थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून प्रताप धुमाळ, अशोक दारकुंडे, अम्मु हे तिन्ही आरोपी सध्या फरार असून पोलीस पथके त्यांच्या मागावर आहेत. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांन्वये आणि बनावट चलन बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही टोळी या बनावट नोटा कुठून छापत होती किंवा कुठून खरेदी करत होती? या रॅकेटचे आंतरराज्यीय धागेदोरे आहेत का? आणि आतापर्यंत या टोळीने किती निष्पाप नागरिकांना जादूटोण्याच्या नावाखाली गंडा घातला आहे? याचा सखोल तपास अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलीस करत आहेत. नागरिकांनी अशा कोणत्याही अंधश्रद्धेला किंवा ‘पैशांचा पाऊस’ पाडण्याच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ———————————— हेही वाचा… ठाण्यात ठाकरे गटाच्या विभागप्रमुखाची गोळ्या झाडून हत्या: पूर्णेकर कुटुंबीयांचे माजी महापौरांवर गंभीर आरोप ठाण्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची मंगळवारी रात्री गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे ठाण्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मानपाडा परिसरातील क्लस्टर डेव्हलपमेंट आणि राजकीय वर्चस्वाच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त होत असून, पूर्णेकर कुटुंबीयांनी ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर या हत्येचे सूत्रधार असल्याचा गंभीर आरोप केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
‘पैशांचा पाऊस’ पाडण्याचा भोंदूगिरीचा डाव उधळला:बारामतीत छापा टाकून 92 लाखांच्या बनावट नोटा जप्त, तिघांना बेड्या