Headlines

साताऱ्याच्या साहिलचा जपानमध्ये सुवर्णवेध!:नागोया आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीत दोन सुवर्णपदकांची कमाई




शूट-ऑफचा क्षण… समोर दक्षिण कोरियाचे आव्हान… दोन्ही संघांची १५७-१५७ अशी बरोबरी. अशा निर्णायक वेळी सातारा तालुक्यातील करंडीच्या साहिल जाधवने धनुष्याची प्रत्यंचा खेचली आणि लक्ष्याच्या मध्यावर नेम साधत भारताच्या सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले. जपानमधील नागोया येथे सुरू असलेल्या २०२६ आशियाई क्रीडा स्पर्धेत साहिलने मिश्र कंपाऊंड सांघिक प्रकारात भारताला सुवर्ण मिळवून दिल्यानंतर पुरुष सांघिक प्रकारातही चीनला २३८-२३७ असे नमवून दुसरे सुवर्णपदक पटकावले. साहिलच्या दोन सुवर्णपदकांच्या कामगिरीने साताऱ्याच्या तिरंदाजीला आशियाई व्यासपीठावर नवी ओळख मिळाली आहे. विशेष म्हणजे दोन्ही अंतिम सामन्यांत भारतीय संघाला कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागले. मिश्र सांघिक प्रकारात साहिल आणि चिकिता तनीपर्थी यांची दक्षिण कोरियाच्या जोडीशी लढत झाली. निर्धारित फेऱ्यांनंतर गुणफलक १५७-१५७ असा समान राहिला. त्यामुळे सामन्याचा निकाल शूट-ऑफमध्ये लागला. दबावाच्या क्षणी साहिलने अचूक नेम साधत भारताला विजयी केले. या विजयाचे आणखी एक महत्त्व म्हणजे भारताला लॉस एंजेलिस २०२८ ऑलिम्पिकसाठी कंपाऊंड प्रकारातील कोटा मिळाला. आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदकासोबतच ऑलिम्पिकच्या दिशेने भारतासाठी हा महत्त्वाचा टप्पा ठरला. पुरुष कंपाऊंड सांघिक प्रकारात साहिलने गणेश आणि कुशल यांच्या साथीने पुन्हा अंतिम फेरीत प्रवेश केला. चीनविरुद्धच्या सामन्यात प्रत्येक नेमाला महत्त्व प्राप्त झाले होते. भारतीय संघाने २३८ गुण नोंदवत चीनच्या २३७ गुणांवर मात केली. केवळ एका गुणाच्या फरकाने मिळालेल्या या विजयाने साहिलच्या खात्यात दुसऱ्या सुवर्णाची भर पडली. साहिलचा हा झंझावाती प्रवास साताऱ्यातील मैदानापासून सुरू झाला. २०१७ मध्ये दहावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने तिरंदाजीचा सराव सुरू केला. सुरुवातीच्या स्थानिक स्पर्धांमध्ये स्वतःची छाप पाडल्यानंतर त्याने राष्ट्रीय स्तर गाठला आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. यापूर्वी त्याच्या नावावर तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्यपदके आहेत. या यशामागे आईचा मोठा त्याग आहे महागडी तिरंदाजीची उपकरणे घेण्यासाठी पैसे अपुरे पडत असताना आई सीमा जाधव यांनी स्वतःचे दागिने मोडून सुमारे तीन लाख रुपये उभे केले. वडील राजेश जाधव खासगी नोकरीत असून सीमा जाधव करंडी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका आहेत. आईने उभ्या केलेल्या पैशांतून घेतलेल्या उपकरणांवर साहिलने कठोर सराव केला आणि त्यातूनच आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीची पायाभरणी झाली. दृष्टी आर्चरीचे प्रशिक्षक प्रवीण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली साहिलने तांत्रिक कौशल्याला पैलू पाडले. अनंत इंग्लिश स्कूलनंतर वाय. सी. कॉलेजमधून एम.एस्सी.ची पदव्युत्तर पदवी घेतानाही त्याने सराव आणि शिक्षणाचा समतोल साधला. सध्या दक्षिण-पूर्व रेल्वे, कोलकाता येथे वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेला साहिल स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये सराव करीत आहे. नागोयातील दोन सुवर्णपदकांनी त्याने आपली क्षमता सिद्ध केली असून, आता त्याचे लक्ष्य ऑलिम्पिकच्या पदकावर आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *