Headlines

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मित्राला अटक!:हल्ला होताना आणि हॉस्पिटलमध्ये नेतानाही होता सोबत, पप्या शिंदे पोलिसांच्या ताब्यात




शिवसेना ठाकरे गटाचे ठाण्यातील विभाग प्रमुख प्रदीप पु्र्णेकर यांची मंगळवारी रात्री त्यांच्या कार्यालयातच निर्घृण हत्या करण्यात आली. मानपाडा परिसरातील मनोरमानगर येथील ऑफिसमध्ये घुसून हल्लेखोरांनी पूर्णेकरांवर सहा ते सात राऊंड फायरिंग केले. त्यांचा जीव गेलाय याची खात्री करण्यासाठी त्यांच्यावर कोयत्यानेही वार करण्यात आले. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे ठाण्यात आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून परिसरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. या हत्येचा तपास करताना पोलिसांनी या कटात सामील असलेल्या पप्या शिंदे याला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा आरोपी पप्या शिंदे प्रदीप पूर्णेकर यांचा मित्र असून, प्रत्यक्ष हल्ला होत असताना तो त्यांच्या ऑफिसमध्येच बसला होता. सध्या पप्या शिंदेची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू असून इतर फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास वेगाने सुरू केला आहे. मुलाने केला धक्कादायक खुलासा प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना या घटनेबाबत धक्कादायक माहिती दिली. राम पूर्णेकर यांनी सांगितले की, हल्ला झाला त्या वेळी पप्या शिंदे स्वतः ऑफिसमध्येच बसलेला होता. अवघ्या दोन दिवसांपूर्वीही तो ऑफिसमध्ये आला होता आणि माझ्या वडिलांशी तास-दीड तास गप्पा मारत बसला होता. मात्र, त्या दिवशी ऑफिसमध्ये इतरही अनेक लोक उपस्थित होते. राम पूर्णेकर यांनी पुढे सांगितले की, घटनेच्या दिवशी सर्वजण गणेशोत्सवाची वर्गणी जमा करण्यासाठी बाहेर पडले होते. त्यामुळे ऑफिसमध्ये वडिलांशिवाय कोणीही नव्हते. गोळी लागल्यानंतर मीच प्रदीप पूर्णेकरांना पकडले, असा दावा पप्या शिंदे करत होता. मात्र, प्रत्यक्ष हल्ल्याच्या वेळी पप्यावर एकही वार झाला नाही किंवा त्याला साधं खरचटलंदेखील नाही, असा संशय राम पूर्णेकर यांनी उपस्थित केला आहे. रुग्णालयातील नाट्य आणि अटकेची कारवाई पुढे बोलताना राम पुर्णेकर यांनी सांगितले की, हल्ल्यानंतर पप्या शिंदे थेट रुग्णालयातही आला होता आणि तिथे कनोजिया नावाच्या व्यक्तीला सतत शिव्या देत होता. परंतु, तपासादरम्यान पोलिसांनी संशयित म्हणून त्यालाच ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे, पप्या शिंदे हा वडिलांचा जुना मित्र होता, असे राम पूर्णेकर यांनी सांगितले. सध्या या हत्येप्रकरणी पोलीस सर्व बाजूंनी कसून तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *