![]()
एमपीएससीच्या विविध प्रश्नांवरून आंदोलनाच्या तयारीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बुधवारी सविस्तर बैठक झाली. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर २ ऑक्टोबर रोजी नियोजित पुण्यातील आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला. एमपीएससी अध्यक्ष, सचिव आणि सदस्यांविरोधात कारवाई करण्याची विद्यार्थ्यांची मागणी होती. अध्यक्ष हे संवैधानिक पद असल्याने त्यांना राज्य सरकार किंवा राज्यपाल हटवू शकत नाहीत. संविधानाच्या कलम ३१७ नुसार याबाबत तीन महिन्यांत न्यायालयीन चौकशी करण्यात येईल आणि चौकशीतील निष्कर्षांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. एमपीएससी सचिवांची तत्काळ बदली करण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच एमपीएससीच्या परीक्षा ऑफलाइनच घेण्यात येतील. विद्यार्थ्यांच्या सर्व घटकांशी चर्चा केल्याशिवाय परीक्षा पद्धतीत कोणताही बदल केला जाणार नसल्याचेही सांगण्यात आले. भरती प्रक्रियेलाही मोठी चालना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडतील इतक्या मोठ्या प्रमाणावर पदभरती केली जाणार असून, गट ‘क’च्या ३ जानेवारीला होणाऱ्या परीक्षेच्या अनुषंगाने पदसंख्या वाढविण्याची मागणी मान्य करण्यात आली. ही वाढ विक्रमी असेल, असे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. याशिवाय तीन वर्षांच्या रिक्त जागा एकाचवेळी जाहीर करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जागांवर एक वर्ष आधीच भरती प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन असून, संपूर्ण भरती कार्यक्रम एका महिन्यात निश्चित केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना सर्व परीक्षा एकाच ‘सिंगल कार्ड’वर देता याव्यात, तसेच प्रत्येक परीक्षेसाठी कागदपत्रे वारंवार सादर करण्याची गरज भासू नये, यासाठी स्वतंत्र यंत्रणा विकसित केली जाणार आहे. “७० हजार पदभरती, ऑफलाइन परीक्षा, सचिवांची बदली आणि सिंगल कार्ड यांसह विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली,” असे विद्यार्थी प्रतिनिधी नितीन आंधळे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर पुढेही चर्चेतून मार्ग काढण्याचे आश्वासन मिळाल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Source link
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्यांना मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद:2 ऑक्टोबरचे आंदोलन तात्पुरते स्थगित, सचिवांची बदली होणार