“ठाण्यातील ठाकरे गटाचे पदाधिकारी सचिन पूर्णेकर यांची हत्या होणे ही अत्यंत दुर्दैवी घटना असून पूर्णेकर कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मात्र, जेथे जेथे राजकारण आणि टीआरपी (TRP) दिसतो, तेथेच केवळ आपल्या पोळ्या भाजण्यासाठी संजय राऊत आणि ‘उबाठा’
.
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रखडलेल्या रस्त्यांच्या कामांसंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. या वेळी त्यांनी ठाण्यातील राजकीय हत्या, संजय राऊतांचे आरोप, दिशा सालियान प्रकरण आणि विरोधकांच्या निवडणूक आयोगाविरोधातील आंदोलनावर जोरदार टीका केली.
महाराष्ट्राचे पोलीस दल सक्षम; कोणालाही पाठीशी घालणार नाही
ठाण्यात ठाकरे गटाचे पदाधिकारी पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यावर विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांवर बोलताना खासदार वाघमारे म्हणाल्या, “महाराष्ट्राचे पोलीस दल अत्यंत सक्षम आहे. आरोपी कोणीही असला, कितीही मोठा असला तरी पोलीस त्याला पाठीशी घालणार नाहीत. या प्रकरणाचा पूर्ण निष्पक्ष तपास होईल आणि दोषींना कठोर शिक्षा होईल.”
संजय राऊतांना खडे बोल
“संजय राऊत स्वतः पत्राचाळ घोटाळ्यात 100 दिवस तुरुंगात राहून आले आहेत आणि सध्या जामिनावर बाहेर आहेत. ते विसरले का? केवळ चिखलफेक आणि आरोप-प्रत्यारोप करण्यापलीकडे त्यांना काही जमत नाही. घरातला कर्ता माणूस गेल्यानंतर रडणाऱ्या कुटुंबीयांचे अश्रू पुसण्याऐवजी तिथे जाऊन स्वतःचा राजकीय स्वार्थ साधणे हे अत्यंत लाजीरवाणे आहे.”
दिशा सालियानच्या वडिलांचा आक्रोश का ऐकू येत नाही?
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना त्यांनी अनेक जुन्या घटनांची आठवण करून दिली. “बीडमधील एका निष्ठावंत कार्यकर्त्याने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून तिरुपतीला पायी वारी केली, तिथे त्याचा मृत्यू झाला. या लोकांनी त्याच्या कुटुंबाची फोनवरून साधी सांत्वना तरी केली का? दिशा सालियानच्या वडिलांचा, सतीश सालियान यांचा आक्रोश यांच्या काळजापर्यंत का पोहोचत नाही? निष्पाप शिवसैनिकांनी जेव्हा रक्त सांडले, तेव्हा उद्धव ठाकरे कुठे होते?”

आनंद दिघेंच्या ठाण्याला बदनाम करू नका
“ठाणे हे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे शहर आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे आवडते गाव आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कर्तृत्वाने विकसित झालेले ठाणे आहे. अशा सुसंस्कृत शहराला गुन्हेगारीचे केंद्र म्हणून बदनाम करण्याचा बेशरम प्रयत्न राऊत आणि कंपनीने बंद करावा.”
नाचता येईना अंगण वाकडे; इंडिया आघाडीचा फेक नॅरेटिव्हचा धंदा बंद करा
निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात विरोधी पक्षांनी पुकारलेल्या देशव्यापी आंदोलनावर ताशेरे ओढताना त्या म्हणाल्या, “जनतेने निवडणुकीत नाकारल्यानंतर विरोधकांची अवस्था ‘नाचता येईना अंगण वाकडे आणि चूल पेटेना पण ओली लाकडे’ अशी झाली आहे. कधी ईव्हीएमला दोष द्यायचा, तर कधी निवडणूक आयोगावर चिखलफेक करायची. सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगासारख्या संविधानाने निर्माण केलेल्या संस्थांना बदनाम करून देशात अराजक माजवण्याचे कारस्थान विरोधक करत आहेत.”
“लोकसभेत खोटे नॅरेटिव्ह चालवून विरोधकांनी तात्पुरता फायदा मिळवला असेल, पण जनतेला आता सर्व कळून चुकले आहे. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राने महायुतीला दणदणीत बहुमत देऊन विरोधकांचे मनसुबे उधळले. आता तरी हा खोटेपणाचा धंदा थांबवावा.”
सोलापूर जिल्ह्यासाठी नितीन गडकरींकडे रस्ते आणि पुलांची मागणी
पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत झालेल्या बैठकीची माहिती दिली. माढा तालुक्यातील हा 33 किलोमीटरचा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असून अतिवृष्टीच्या काळात यामुळे 5 ते 6 गावांचा संपर्क तुटतो. हा रस्ता तातडीने पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली. सोलापूर महामार्गावरील प्रसिद्ध बाळे खंडोबा तीर्थक्षेत्राकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाचे व पोचमार्गाचे काम डिसेंबरमधील यात्रेपूर्वी युद्धपातळीवर सुरू करण्याचे आश्वासन गडकरींनी दिले आहे. भोगाव, बाणेगाव आणि होणसळ या प्रजिमा रस्त्यांच्या सुधारणांचे प्रस्तावही मंजूर करून नागरिकांची गैरसोय दूर करण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्र्यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.
———————————
हेही वाचा…
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण:गुन्हेगारांना फाशीची शिक्षा होईपर्यंत शांत बसणार नाही, उद्धव ठाकरेंचा इशारा

ठाण्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्येने संपूर्ण ठाणे शहर हादरले आहे. या दुःखाच्या प्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज थेट ठाण्यात धाव घेत पूर्णेकर कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत, “जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांना फासावर लटकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही,” असा थेट इशारा दिला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी