![]()
a पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पावसाच्या भरवशावर पेरलेली पिके आता पाण्याअभावी करपू लागली असून, हातातोंडाशी आलेले पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची अक्षरशः जीवाची बाजी सुरू आहे. ‘कॉटन बेल्ट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खारपानपट्ट्यात सध्या पावसाअभावी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवारातील जमीन कोरडीठाक पडली असून, अनेक ठिकाणी जमिनीला भेगा पडल्या आहेत. उभ्या पिकांची पाने पिवळी पडू लागली असून, कपाशीचे पीक वाळण्याच्या मार्गावर आहे. एका बाजूला आभाळाकडे डोळे लावून बसलेला शेतकरी आणि दुसऱ्या बाजूला पिके वाचवण्यासाठी खिशातून हजारो रुपये खर्च करण्याची वेळ, असे दुहेरी संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. कुठे डोळ्यादेखत सोन्यासारखे कपाशीचे पीक जळून खाक होत आहे, तर कुठे अल्पभूधारक शेतकरी सहा- सहा किलोमीटर अंतरावरून टँकरने पाणी आणून पिकांना जीवदान देण्याचा प्रयत्न करत आहेत. पीक जगविण्यासाठी सुरू असलेली ही धडपड सध्याच्या दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित करणारी आहे. पाते, फुले आणि बोंडे लागण्याच्या काळातच पावसाने दडी मारली कपाशीचे पीक वाढत असताना त्याला पाते, फुले आणि बोंडे लागण्याचा काळ अत्यंत महत्त्वाचा असतो. याच काळात पिकाला पुरेशा पाण्याची आवश्यकता असते. मात्र, पावसाने ओढ दिल्याने शेतातील ओलावा झपाट्याने कमी झाला. कडक उन्हामुळे जमिनीला भेगा पडू लागल्या व कपाशीची पाने पिवळी पडून कोमेजण्यास सुरुवात झाली. दिवसेंदिवस पिकाची अवस्था डोळ्यादेखत खालावत असल्याचे पाहून वराईकर यांची चिंता वाढली. पावसाची प्रतीक्षा करत आणखी काही दिवस बसून राहिल्यास उभे पीक हातातून जाण्याची शक्यता होती. त्यामुळे त्यांनी पैसे खर्च करत पाणी देण्याचा निर्णय घेतला. आकाशात ढग जमा झाले की पाऊस पडेल, अशी आशा शेतकऱ्यांना वाटते. मात्र, ढग येतात आणि निघून जातात. पावसाची प्रतीक्षा दिवसेंदिवस वाढत आहे. शेतातील पिकांकडे पाहताना शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत आहे.एकीकडे कपाशीला फुले आणि बोंडे लागण्याचा काळ सुरू असताना दुसरीकडे पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे पाऊस पडला तर पीक वाचेल आणि पाऊस लांबला तर मोठे नुकसान होईल, अशा द्विधा मनःस्थितीत शेतकरी आहेत. पावसाअभावी अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट होत असताना शासनाने या संकटाची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे. केवळ कागदोपत्री उपाययोजना न करता प्रत्यक्ष शेतात जाऊन परिस्थितीची पाहणी करावी, पिकांचे नुकसान आणि पाण्याची उपलब्धता याचा आढावा घ्यावा तसेच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आवश्यक ती आर्थिक मदत द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पिके वाचविण्यासाठी शेतकरी स्वतःच्या खिशातून हजारो रुपये खर्च करीत असताना शासनाकडूनही तातडीने मदतीचा हात मिळावा, अशी अपेक्षा आहे. अन्यथा पावसाने साथ न दिल्याने आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांवर टँकरच्या पाण्याचा अतिरिक्त आर्थिक बोजा पडत राहणार आहे. खारपानपट्ट्यातील परिस्थिती चिंताजनक : खारपानपट्ट्यातील अनेक शेतकऱ्यांचे शेतीचे गणित पावसावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. पावसाची अनिश्चितता वाढल्याने खरीप हंगामातील पिकांच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.कपाशी, सोयाबीन आणि इतर खरीप पिकांसाठी पावसाची आवश्यकता असताना पावसाने खंड दिल्यामुळे शेतकऱ्यांना पिके जगविण्यासाठी पर्यायी मार्गांचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र, प्रत्येक शेतकऱ्याला टँकरने पाणी देणे शक्य नाही. ज्यांच्याकडे आर्थिक क्षमता आहे ते कसाबसा खर्च करून पीक वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत; मात्र अल्पभूधारक आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत शेतकऱ्यांसमोर अधिक गंभीर संकट निर्माण झाले आहे. टँकरने किती दिवस वाचणार पीक सध्या टँकरचे पाणी शेतातील पिकासाठी जीवनदायी ठरत आहे. टँकरचा खर्च दिवसेंदिवस वाढत गेला तर शेती परवडणार कशी, हा मोठा प्रश्न आहे. दोन एकर कपाशीला रोज ९ टँकर पाणी देण्यासाठी ७ ते ८ हजार रुपये खर्च होत आहे. त्यामुळे पाऊस लवकर झाला नाही तर पिकाला पाणी देण्याचा खर्च आणि शेवटी मिळणारे उत्पन्न यांचे गणित बिघडण्याची भीती आहे. कपाशी वाचवण्यासाठी टँकरचा घेतला आधार वरूर जऊळका येथील शेतकरी सुधाकर मधुकर वराईकर यांची दोन एकर शेती आहे. पावसाच्या सुरुवातीच्या आशेवर त्यांनी जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कपाशीची लागवड केली. पावसाळ्याच्या सुरुवातीला पाऊस झाल्याने पिकाला चांगली सुरुवात मिळाली. त्यामुळे यंदा कपाशीचे चांगले उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा वराईकर यांना होती. कपाशीची लागवड करताना बियाणे, खते, निंदणी, कोळपणी यासाठी मोठा खर्च करावा लागला. हा खर्च भागवण्यासाठी बँकेकडून कर्जासह हातउसने करून त्यांनी पिकात पैसा गुंतवला. शेतात हिरवेगार पीक डोलू लागल्यानंतर कर्ज फेडण्याची व कुटुंबाचा आर्थिक गाडा सुरळीत करण्याची आशा त्यांच्या मनात निर्माण झाली होती. मात्र दुष्काळाने आशेवर पाणी फेरल्या गेले. कर्ज काढून कपाशीची लागवड; ते कसे फेडणार ^आम्ही रात्रंदिवस एक करून शेती कसत आहोत, पण निसर्गाने पुरती पाठ फिरवली आहे. जर आम्ही आता दिवसाला हजारो रुपये खर्च करून टँकर लावला नाही, तर हाता-तोंडाशी आलेला घास जळून राख होईल. कपाशी लागवडीचा खर्च आधीच कर्ज काढून केला आहे. आता हा टँकरचा खर्च कसा सोसायचा, हा प्रश्न आहे. पाऊस पडला तर पीक वाचेल, पण तोपर्यंत टँकरचा खर्च करणे भाग आहे. – सुधाकर मधुकर वराईकर, शेतकरी, वरूर जऊळका. पाण्यासाठी शेतकऱ्याचा संघर्ष शेताजवळ पाणी नसल्याने वराईकर यांना सहा किलोमीटर अंतरावरून टँकरने पाणी आणावे लागत आहे. कपाशी वाचावी, यासाठी दररोज धावपळ सुरू आहे.दोन एकर कपाशीचे पीक जगवण्यासाठी त्यांना दररोज ९ टँकर पाणी विकत घ्यावे लागत आहे. एका टँकरसाठी ८०० ते ९०० रुपये खर्च येतो. पाण्यासाठीच दररोज जवळपास ७ ते ८ हजार रुपये खर्च होत आहेत. शेतीतून उत्पन्न मिळण्यापूर्वीच पिकावर हजारो रुपयांचा अतिरिक्त खर्च करण्याची वेळ आल्याने शेतकऱ्याच्या आर्थिक अडचणीत आणखी भर पडली आहे.
Source link
पाणी आणून कपाशी जगवण्याची धडपड:दोन एकर कपाशीला दररोज 9 टँकर; बळीराजाला रोज 7 ते 8 हजारांचा आर्थिक भुर्दंड