![]()
महात्मा गांधी जयंती आणि जागतिक अहिंसा दिनानिमित्त महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल, महाराष्ट्र यांच्या वतीने गुरुवारी डेक्कन येथील मक्केशाह मस्जिद व पांचाळेश्वर मंदिर ते कोथरूड येथील गांधी भवनदरम्यान शांती मार्च काढण्यात आला. या मार्चमध्ये विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, शिक्षक तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले. तिरंगा आणि गांधी विचारांचे फलक हातात घेतलेल्या तरुण-तरुणींनी दिलेल्या घोषणांमुळे परिसर दुमदुमून गेला. शांती मार्चच्या प्रारंभी ‘शिवराय ढोल-ताशा पथका’च्या वादकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत ढोल-ताशांच्या गजरात मानवंदना दिली. त्यानंतर मार्चला सुरुवात झाली. महात्मा गांधी यांच्या वेशभूषेतील नीलकंठ लिगाडे, सोहम खांगटे आणि पुंडलिक शेळके यांनी लक्ष वेधून घेतले. नागरिकांनी त्यांच्यासोबत सेल्फीही घेतले. ‘हम सब एक हैं’, ‘महात्मा गांधी अमर रहे’, ‘गांधींचा विचार, राष्ट्रीय एकात्मतेचा विचार’, ‘गोली नही, बोली चाहिये’, ‘नफरत छोडो, भारत जोडो’, ‘युद्ध नको, बुद्ध हवा’, ‘दंगलमुक्त समाजासाठी, दंगलमुक्त पुण्यासाठी’ आणि ‘प्रांतभेद छोडो, भारत जोडो’ अशा घोषणांतून विद्यार्थ्यांनी शांतता, अहिंसा आणि सामाजिक सलोख्याचा संदेश दिला. महर्षी कर्वे पुतळ्याजवळ श्रीमंत गर्जना ढोल-ताशा पथकाने वादन करून सहभागींचा उत्साह वाढविला. गांधी भवन येथे दोन्ही ढोल-ताशा पथकांनी वादन करत मार्चचे स्वागत केले. यावेळी भारती विद्यापीठ महाविद्यालय, आबेदा इनामदार महाविद्यालय, विश्र्वशांती एमआयटी विद्यापीठ, जाधवर महाविद्यालय, एसएनडीटी महाविद्यालय, आझम कॅम्पस एमसीएस महाविद्यालय, सर्वोदय, माहेर संस्था तसेच युवक क्रांती दलातील विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. गांधी भवन येथे झालेल्या कार्यक्रमात शुभांगी मुळे व सहकलाकारांनी प्रार्थना आणि भजने सादर केली. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष तथा भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, विश्वस्त अन्वर राजन, सीए एम. एस. जाधव, प्रवीण सप्तर्षी, रमेश आढाव, जांबुवंत मनोहर, ॲड. गोपाल गुणाले, श्रीराम टेकाळे, आप्पा अनारसे, तेजस भालेराव, सूरज कुलकर्णी, सचिन चौहान, रवींद्र धनक, कमलाकर शेटे, हर्षवर्धन जाधव, जयदीप भालेराव, ॲड. स्वप्निल तोंडे आदी उपस्थित होते. गांधी विचार पुढे नेणे ही जबाबदारी : कदम डॉ. शिवाजीराव कदम म्हणाले, ‘‘गेल्या १५ वर्षांपासून गांधी सप्ताहाचे आयोजन केले जात असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गांधी अजरामर असून त्यांचे विचार पुढे नेणे आवश्यक आहे. सर्वसामान्य माणूस ते राष्ट्रपिता हा त्यांचा प्रवास समजून घेणे गरजेचे आहे. तरुणांमधील ऊर्जा योग्य दिशेने वळविणे आवश्यक असून विद्यार्थ्यांनी स्वतःचे नेतृत्व सिद्ध करावे.’’
Source link
गांधी जयंतीनिमित्त पुण्यात शांती मार्च:तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग, ‘गांधी विचार म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचा विचार’चा संदेश