![]()
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा प्रवाह नेमस्त, जहाल आणि पुढे गांधीवादाकडे वळला. गांधीवाद हा शांतिमय क्रांतिवाद होता. सैद्धांतिक पायाविना राजकारण, कष्टाविना संपत्ती, विवेकाविना उपभोग, चारित्र्याविना शिक्षण, नीतीविना व्यापार, मानवतेविना विज्ञान आणि त्यागाविना उपासना ही सात दुरितं गांधीजींनी आपल्या विचारातून सांगितली. असे दुराचार आपल्या हातून घडू नयेत हे विचार त्यांनी समाजापुढे आणले, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, मराठी विश्र्वकोश मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांनी केले. मनोहारी मैत्र संघ, पुणेतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने शुक्रवारी (दि. २) आयोजित करण्यात आलेल्या डॉ. श्रीपाल सबनीस सन्मान व्याख्यानमालेत ‘क्रांतिकारक गांधी’ या विषयावरील व्याख्यानात डॉ. राजा दीक्षित बोलत होते. पत्रकार भवन येथे आयोजित कार्यक्रमात रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांचा डॉ. श्रीपाल सबनीस संस्कृती सेवा पुरस्काराने गौरव करण्यात आला. पुणेरी पगडी, शाल, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस अध्यक्षस्थानी होते. महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. मनोहारी मैत्र संघाचे प्रमुख मनोहर कोलते, मारुती डोंगरे मंचावर होते. नि:शस्त्र चळवळीतून गांधीजींनी संग्राम उभा केला आणि त्याला लोक चळवळीचे स्वरूप दिले, असे सांगून डॉ. राजा दीक्षित पुढे म्हणाले, गांधीजींनी सर्वजनवाद देखील मांडला. संघर्ष-विराम आणि संघर्ष या माध्यमातून देशव्यापी चळवळी सुरू केल्या. त्यांच्या विधायकतेला क्रांतिकारकता होती. अहिंसा हे दुर्बलतेचे लक्षण नाही हे विचार त्यांनी समाजात पेरत अहिंसेला निर्भयतेची जोड दिली. आजच्या सत्त्योत्तर युगात सत्याची वस्रे पांघरलेले असत्य सगळीकडे वावरत आहे, अशा वेळी गांधीजींच्या शिकवणीची आठवण काढणे गरजेचे आहे. पुरस्काराला उत्तर देताना ॲड. प्रमोद आडकर म्हणाले, कार्यात सातत्य ठेवत समाजप्रबोधनाची आस घेऊन अखंडितपणे कार्यरत राहिलो आहे. अध्यक्षपदावरून बोलताना डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, आजच्या सर्वार्थाच्या धर्मकारण आणि राजकारणामध्ये गांधीविचारांचे प्रबोधन मोलाचे आहे. गांधींचा विचार हा देशाचाच नव्हे तर विश्वाचा विचार आहे.
Source link
ॲड. प्रमोद आडकर यांना डॉ. श्रीपाल सबनीस संस्कृती सेवा पुरस्कार:मनोहारी मैत्र संघातर्फे व्याख्यानात डॉ. राजा दीक्षित म्हणाले गांधीवाद शांतिमय क्रांतिवाद