.

महिला सक्षमीकरण, आर्थिक स्वावलंबन, शाश्वत उपजीविकेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी ‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान ‘सेवा संकल्प अभियान’ राबवण्यात येत आहे. महिलांनी एकत्र येऊन बचत करावी. आर्थिक व्यवहारांचे नियोजन शिकावे. स्वयंरोजगारातून कुटुंबाच्या प्रगतीत हातभार लावावा. हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. मात्र, ग्रामीण भागातील अनेक महिला अजूनही बचत गटांशी जोडल्या गेलेल्या नाहीत. अशा महिलांना प्रवाहात आणण्यासाठी ‘उमेद’ने शाळकरी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून भावनिक साद घालण्याचा नावीन्यपूर्ण प्रयोग हाती घेतला आहे.
आईला गटात आणण्याची जबाबदारी चिमुकल्यांवर- बोर्डी येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित कार्यक्रमात जिल्हा अभियान व्यवस्थापक नरेंद्र काकड यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. ज्या विद्यार्थ्यांच्या आई अद्याप कोणत्याही बचत गटात सहभागी नाहीत, त्यांनी घरी जाऊन आईला बचत गटाचे फायदे समजावून सांगावेत. तिला गटात सामील होण्याचा हट्ट धरावा. असे आवाहन त्यांनी केले. मुलांच्या भावनिक हाकेला आईकडून तत्काळ सकारात्मक प्रतिसाद मिळतो. हा मानसशास्त्रीय विचार यामागे आहे. याप्रसंगी तालुका अभियान व्यवस्थापक नितीन वाघ, ग्रामसखी उपस्थित होत्या. बोर्डी शाळेचे पर्यावरणपूरक व शैक्षणिक प्रयोग- बोर्डी जिल्हा परिषद शाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे.शाळेत नारळाच्या भुशाचा वापर करून ‘मातीविरहित शेती’चा यशस्वी प्रयोग राबवण्यात आला आहे. भाजीपाला लागवडीतून विद्यार्थ्यांना शेती, श्रमाचे प्रत्यक्ष धडे दिले जात आहेत. त्यासोबतच विद्यार्थ्यांना सकस आहार, आरोग्यदायी वातावरण, बैठक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. जागतिक ज्ञान, भौगोलिक भान वाढावे, यासाठी परिसरात विविध देशांचे नकाशे, वेगवेगळ्या देशांतील प्रमाणवेळ दर्शवणारी घड्याळे लावण्यात आली आहेत. कॉन्व्हेंट संस्कृतीच्या काळात ही शाळा गुणवत्तेचा आदर्श ठरत आहे. शाळेचे मुख्याध्यापक उमेश चोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक शिक्षक सतीश धांडे, नितीन मासोदकर, लता पुराम, माया लायबर, रागिनी खोटरे हे विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक जडणघडणीसाठी परिश्रम घेत आहेत.
शाश्वत उपजीविकेत महत्त्वाची भूमिका ^ सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर दरम्यान विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. ‘उमेद’ अभियानाच्या माध्यमातून जास्तीत जास्त स्वयंसहाय्यता समूह तयार व्हावेत, अद्याप गटात सहभागी नसलेल्या महिला बचत गटात याव्या, यासाठी अभियानाला गती देण्यात आली. झेडपी सीईओ व प्रकल्प संचालक दिगंबर लोखंडे यांच्या मार्गदर्शनात हे काम सुरू आहे. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व शाश्वत उपजीविका निर्माण करण्यासाठी बचत गटांची भूमिका महत्त्वाची आहे. – नरेंद्र सुभाषराव काकड, जिल्हा अभियान व्यवस्थापक, उमेद अभियान, अकोला.
डोळ्यांची भाषा अन् चिमुकल्यांचा उत्साह कार्यक्रमादरम्यान जिल्हा अभियान व्यवस्थापक नरेंद्र काकड यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना विविध हावभाव, डोळ्यांच्या भाषेचा वापर करून वातावरणात उत्साह निर्माण केला. त्यांच्या संवादामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रमात सहभाग घेतला. आईला बचत गटात सहभागी करून घेण्याचा संदेश विद्यार्थ्यांनी मनापासून स्वीकारला आहे.