![]()
निवडणूक आयोग आणि सत्ताधारी भाजपच्या मनमानी कारभाराविरोधात पुकारलेल्या महामोर्चात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ईव्हीएम आणि मतदार याद्यांमधील घोळावरून जोरदार हल्लाबोल केला. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत रातोरात ४० ते ६० लाख मतदार वाढवल्याचा आणि ‘SIR’ प्रक्रियेद्वारे दोन कोटी मतदारांना बेकायदेशीरपणे वगळल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. देशातील सर्वोच्च संस्था आणि माध्यमे सत्ताधाऱ्यांनी ताब्यात घेतल्याचा दावा करत, ‘SIR’ प्रक्रिया तातडीने रद्द करावी आणि ईव्हीएम हद्दपार करून यापुढे सर्व निवडणुका ‘बॅलेट पेपर’वरच घ्याव्यात, अशी आक्रमक मागणी राज ठाकरे यांनी या मोर्चात केली. राज ठाकरे म्हणाले, सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या जमलेल्या सर्व मतदार बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो. इथेही वातावरण तापलंय उन्हामुळे आणि देशातही वातावरण तापलंय व्होट चोरीमुळे. आजचा मोर्चा हा कशासाठी आहे, काय आहे आपल्याला सर्वांना पूर्णपणे माहिती आहे. २०१७, २०१८ तेव्हापासून हा राज ठाकरे तुम्हाला सांगत आला की याच्यामध्ये चोऱ्या सुरू आहेत. त्यावेळेला मी सोनिया गांधींना भेटलो होतो, त्यावेळेला मी ममता बॅनर्जींना भेटलो होतो, मी त्यावेळेला अनेक नेत्यांना भेटलो होतो आणि त्यांना सतत सांगत होतो की ज्या प्रकारचा निवडणूक आयोग, मग ती मशीन असतील, मतदार याद्या असतील जो घोळ सुरू आहे, आपण याच्यावरती पाऊल उचललं पाहिजे आणि त्यावेळेला तर सांगत होतो की निवडणुकीवरती बहिष्कार टाका. त्याशिवाय दूध का दूध, पाणी का पाणी होणार नाही. हे मी २०१७-१८ पासून सांगतोय याच्यामध्ये घोळ आहे, अशा प्रकारे मतं कमी होऊ शकत नाहीत आणि भारतीय जनता पक्षाची मतं अशी वाढू शकत नाहीत. हे इथे जयंत पाटील बसलेत, शेतकरी कामगार पक्षाचे, इथे राष्ट्रवादीचे सगळे नेते बसलेत, जयंत पाटील इथे पण बसलेत, आठवतंय ना? आठवतंय तुम्हाला? हे सगळे जण होते सुरुवातीला, मला हो बोलले. पण मी काय म्हणत होतो हे आता समजायला लागलं सगळ्यांना. अन्यथा असं होऊच शकत नाही. तुम्हाला आठवत असेल विधानसभेची निवडणूक आता गेली २०२४ ची. संपूर्ण बहुमत! महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष आणि ते शिंदे वगैरे सगळ्या लोकांना संपूर्ण बहुमत मिळालं. महाराष्ट्रात काय सन्नाटा! महाराष्ट्रामध्ये जल्लोष नाही! असा कोणता विजय असतो की जिकडे विजय मिळवल्यानंतर देखील लोकांमध्ये उत्साह नाही, लोकांमध्ये जल्लोष नाही, संपूर्ण महाराष्ट्रभर सन्नाटा होता. हा कोणता विजय? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. ४० ते ६० लाख मतदार वाढतात कसे अचानक? २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये सहा महिन्यांमध्ये जवळपास महाराष्ट्रामध्ये ४० ते ६० लाख मतदार वाढवले गेले. ४० ते ६० लाख मतदार वाढतात कसे अचानक? असा कुठला व्हायग्रा आहे? हे धनाधन मतदार वाढतायत! ४० ते ६० लाख! म्हणजे मी आता इकडे आकडा आणलाय, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला दोन कोटी ४४ लाख २७ हजार मतं मिळाली होती लोकसभेला. तेच सहा महिन्यांनंतर ज्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीला भारतीय जनता पक्षाला तीन कोटी १६ लाख १६ हजार मतं पडली. एक कोटी मतं वाढली! इतकी लाख मतं वाढली तुमची? अरे आता तर सगळं उघडच झालंय, सगळ्या गोष्टी उघड झाल्यात, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. किती आंदोलनं करावीत, किती मोर्चे काढावेत? राज ठाकरे म्हणाले, मला या गोष्टी बद्दल फक्त बोलताना एकच गोष्ट सत्ताधारी पक्षाला सांगायचीये. आम्हाला कुठचा राग नाहीये की तुम्ही सत्तेवरती बसलात म्हणून. तुम्ही सत्ता कशी राबवताय आणि कशातनं राबवताय त्याचा राग आहे. राग आम्हाला त्या गोष्टींचा आहे! या देशातल्या मतदारांनी ठरवावं कोणाला निवडून द्यायचं, कोणाला सत्तेवर बसवायचं, कोणाला विरोधी पक्षात बसवायचं. लोकांनी तुम्ही ठरवावं, निवडणूक आयोगाने नाही. साधी गोष्ट आहे, आपल्याला एवढी तर गोष्ट कळली पाहिजे. मनमानी जो कारभार सुरू आहे, एकाच उद्योगपतीला जंगल देऊन टाकायची, एकाच उद्योगपतीला जमिनी देऊन टाकायच्या, एकाच उद्योगपतीला विमानतळ देऊन टाकायची, एकाच उद्योगपतीला पोर्ट देऊन टाकायचे. ही गोष्ट येते कुठून, की आम्ही काही केलं तरी फरक पडत नाही, आम्ही जे मनात आणू ते आम्ही सगळं करू. हे येतं कुठून? हे निवडणूक आयोगाला बांधल्याशिवाय येऊ शकत नाही. या देशातल्या जनतेने काही ओरडावं, काही बोलावं, किती आंदोलनं करावीत, किती मोर्चे काढावेत, पण निवडणूक आयोग आमच्याबरोबर असेल तर आम्ही कसेही निवडून येऊ, आम्हाला जसं वागायचंय तसं आम्ही वागू. सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट ताब्यात घेऊन ठेवलीत पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, या देशाची आर्थिक स्थिती बरबाद करायची आहे, आम्ही बरबाद करून टाकू. आम्हाला अमेरिकेला फक्त सरेंडर व्हायचंय, आम्ही सरेंडर होऊ. वाटेल ते करू. आम्ही पेट्रोलचे भाव वाढवू, अन्नधान्याचे भाव वाढवू, तुम्हाला रांगांत उभं करू. कुठचाही राजकीय पक्ष ज्यावेळेला सत्तेवरती बसलेला असतो त्याला एक धाकधूक असते, भीती असते. उद्या जर समजा आपण एखादा पाऊल उचलल्यानंतर लोकांनी जर समजा आपल्याला मतदान नाही केलं आणि आपली सत्ता गेली तर काय होईल, अशी धाकधूक असते. अशी कोणतीही भीती ना महाराष्ट्रात, ना केंद्रात, कुठेही तुम्हाला दिसत नाही. दिसली जमीन, देऊन टाका अदानीला. आमचा राग किंवा विरोध हा कुठच्या उद्योगपती, कोणाबद्दलचा नाहीये. उद्योगपती या देशाला हवेत. काँग्रेसच्या काळातही अनेक उद्योगपती उभे राहिले. पण अनेक उद्योगपती उभे राहिले, यांच्या काळामध्ये फक्त एक उद्योगपती मोठा होताना दिसतो, ही हिंमत आली कुठून? याचं कारण… सगळे सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आम्ही ताब्यात घेऊन ठेवली आहेत, सगळे चॅनल्स आम्ही ताब्यात घेऊन ठेवली आहेत, निवडणूक आयोग आम्ही ताब्यात घेऊन ठेवलेत. तुमच्यापर्यंत खऱ्या बातम्या पोहोचवायच्याच नाहीत. ..त्या क्षणाला सत्ता जायला सुरुवात होते राज ठाकरे पुढे म्हणाले, मला असं वाटतं सत्तेतल्या कोणत्याही राजकीय पक्षाने या गोष्टींचा विचार केला पाहिजे की आपण चुकीचं उचललेलं पाऊल, चुकीचं घेतलेलं धोरण, हा भविष्यातला एखादा पायंडा पडणार का? सत्ता ज्या दिवशी यायला सुरुवात होते, त्या क्षणाला सत्ता जायला सुरुवात होते. तुम्ही किती काळ फक्त ती पुढे ढकलताय एवढाच फक्त विषय असतो. आज भारतीय जनता पक्ष आज सत्तेवरती आहे, उद्या सत्तेवरती नसेल, उद्या दुसरा कुठचा पक्ष सत्तेवरती असेल. आणि उद्या तो पक्ष ज्यावेळेला सत्तेवरती येईल आणि अशाच प्रकारे जर समजा सत्ता राबवायची त्यांनी ठरवली, तुम्ही काय कराल? त्यावेळेला तुम्ही काय करणार? तुम्ही आंदोलन कराल, मोर्चे काढाल, नाही ऐकायचं आम्हाला कोणाचं. आणि उद्या दुसरे पक्ष येऊन जर समजा त्यांनी दाम दुपटीने जर समजा या गोष्टी ह्याच्यापेक्षा जास्त केल्या, कुठे जाल? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. वाटेल तशा मतदार याद्या करून सत्ता मिळवण्याचे काम सुरू आपण या देशाचा ढाचा बदलतो आहोत, आपण या देशाचा ढाचा कोसळून टाकतो आहोत, याचही भान सुटलंय. भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांनी कसं जगायचं, कसं राहायचं या देशामध्ये? कशाही पद्धतीने यायचं, सत्ता मिळवायची आणि लोकांवरती वरवंटा फिरवायचा? कसं होईल? आजचा मोर्चा हा त्याच्या विरोधातला आहे. आज सर्व राजकीय पक्ष इथे व्यासपीठावरती बसलेत. सत्तेतले पक्ष आज इथे व्यासपीठावरती नाहीयेत. पण त्या सत्तेतल्या लोकांनी देखील विचार करणं गरजेचं आहे. तर तुम्ही विचार करा ज्या दिवशी तुम्ही विरोधी पक्षात जाल, दुसरे ज्यावेळेला सत्तेवरती येतील आणि तुम्ही करत असलेली गोष्ट जर दाम दुपटीने समजा त्यांनी जास्त केली, त्यावेळेला तुम्ही काय करणार आहात? जो लोकांसमोर जाईल, जो लोकांना चांगलं काम करेल, जो लोकांना विश्वास देईल, लोक त्याला मतदान करतील. पण लोकांना अंधारात ठेवायचं, लोक मतदानच नाही करत आहेत, बोगस वोटर वाढवायचे, वाटेल तशा मतदार याद्या करायच्या आणि त्याच्यामधनं सत्ता प्राप्ती करायची… किती काळ चालणार? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. SIR हे बेकायदेशीर राज ठाकरे म्हणाले, आज मला फक्त दोन विषय फक्त महत्त्वाचे मांडायचेत. त्यातला पहिला विषय देशात तर होईलच पण महाराष्ट्रामध्ये जो आतापर्यंत SIR झाला तो संपूर्णपणे रद्द झाला पाहिजे. एक कालची गोष्ट तुम्हाला सांगतो. माजी केंद्रीय गृह सचिव आणि मोदींच्या काळातील भारतीय जनता पक्षाचे माजी मंत्री आर. के. सिंग यांनी SIR बद्दल काय सांगितलंय तेवढं फक्त तुम्ही ऐकून घ्या. आर. के. सिंग यांच्या मते, ‘रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल अॅक्ट’ च्या कलम २१ अंतर्गत ‘स्पेशल रिव्हिजन’ (म्हणजे आता हे SIR चालू आहे) ही अपवादात्मक परिस्थितीत, कारणे लेखी नोंदवून आणि विशिष्ट मतदारसंघ किंवा भागापुरता करता येते. त्यामुळे संपूर्ण देशात एकाच वेळी ‘इंटेन्सिव्ह रिव्हिजन’ करणं हे बेकायदेशीर आहे. SIR संपूर्ण संपूर्ण देशभर किंवा राज्यभर राबवण्याची कायद्यातच तरतूद नाही. समजा एखादी मोठी नैसर्गिक आपत्ती आली, जसं की पूर, भूकंप, एखाद्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावरती माणसं स्थलांतरित झाली किंवा खूप डुप्लिकेट नावं आहेत अशा मोठ्या प्रमाणावर तक्रारी आल्या, तर आणि तरच SIR केलं जाऊ शकतं. पण इथे सरसकट SIR कशासाठी केलं गेलं? म्हणजे जे SIR चं आता प्रकरण देशभर सुरू आहे, हे बेकायदेशीर आहे. SIR हा रद्द झाला पाहिजे आणि बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजेत राज ठाकरे म्हणाले, विधानसभेच्या वेळेला ४० ते ६० लाख मतदार वाढवायचे, तुम्ही त्याच्यातनं सत्ता घ्यायची आणि आता SIR मधनं दोन कोटी लोक बाहेर काढलेत! दोन कोटी! हे कोण आहेत दोन कोटी? ही दोन कोटी लोकं आमचे मतदार आहेत का ते कोण आहेत? आणि म्हणून माझी सर्व राजकीय पक्षांना विनंती आहे, ज्यावेळेला तुम्ही सगळेजण दिल्लीत ज्यावेळेला बोलाल, त्यावेळेला एक तर SIR हा रद्द झाला पाहिजे कोणत्याही परिस्थितीत आणि दुसरं म्हणजे या देशातलं वोटिंग मशीन बंद होऊन बॅलेट पेपर वरती याच्यापुढे मतदान झालं पाहिजे. या दोन गोष्टी झाल्या तर दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. उद्या कोणाचीही सत्ता येऊ देत, काही फरक पडत नाही पण ती योग्य मार्गाने यावी, एवढीच फक्त विनंती करण्यासाठी म्हणून आज तुमच्या समोर इथे आलो. आपण इतक्या मोठ्या संख्येने सगळेजण इथे या मोर्चाला सामील झालात, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो.
Source link
देशात व्होट चोरीमुळे वातावरण तापलंय:'EVM' आणि मतदार याद्यांमधील घोळावर राज ठाकरेंचा हल्लाबोल; वाचा संपूर्ण भाषण एका क्लिकवर