![]()
औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथील अल्पभूधारक शेतकऱ्याच्या 9 शेळ्या दगावल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अवघ्या दहा मिनिटात होत्याचे नव्हते झाल्याने आता या शेतकऱ्यावर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून शासनाने आर्थिक मदत देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथील शेतकरी सुर्यकांत रिठ्ठे यांना त्यांच्या मालकीची एक एकर शेती आहे. या शेतावर तसेच रोजमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. मात्र मागील काही वर्षात शेतीमध्ये नापिकी तसेच हाताला काम मिळत नसल्याने त्यांच्या कुटुंबावर बाहेर जिल्ह्यात जाऊन काम करण्याची वेळ आली होती. मात्र त्यांनी बाहेर जाऊन काम करण्या ऐवजी शेळीपालनाचा व्यवसाय निवडला. मागील पाच वर्षापासून ते या व्यवसायात आहेत. शेळ्या खरेदी करून त्यांचे पालनपोषण केल्यानंतर त्यांची आठवडी बाजारात विक्री करायची अन त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नात कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविला जात होता. दरवर्षी यातून बऱ्यापैकी उत्पन्न मिळू लागले होते. बाहेर जिल्ह्यात जाऊन रोजमजूरी करून त्या ऐवजी गावातच राहून शेळीपालन हा व्यवसाय त्यांना परवडणारा ठरला होता. सध्या त्यांच्याकडे 23 शेळ्या असून या शेळ्या पिंपळदरी परिसरातील शिवारात चारण्यासाठी नेल्या जातात. नेहमी प्रमाणे रिठ्ठे हे शनिवारी ता. 3 शेळ्या चारण्यासाठी शिवारात गेले होते. दुपारपर्यंत शेळ्या चारल्यानंतर त्यांना पाणी पाजले. मात्र अवघ्या दहा मीनीटातच त्यापैकी 9 शेळ्या दगावल्या. यामध्ये त्यांचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. ऐन दुष्काळी परिस्थितीत हे दुसरे संकट ओढवल्याने शेतकरी रिठ्ठे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. या परिस्थितीमुळे आता दुष्काळी परिस्थितीत कुटुंबाचा उदनिर्वाह कसा चालवावा असा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला असून आता पत्नीसह तीन मुलांना सोबत घेऊन बाहेर जिल्ह्यात कामाच्या शोधात भटकंती करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. शासनाने त्यांच्या कुटुुंबाला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
Source link
पिंपळदरीत दुष्काळी परिस्थितीचा तडाखा:अल्पभूधारक शेतकऱ्याच्या 9 शेळ्या दगावल्याने कुटुंबावर आर्थिक संकट