Headlines

पुण्यात 1 कोटींवरील घरांची विक्री 32 टक्के वाढली:50 लाखांखालील घरांची मागणी 22टक्के घटली; एकूण विक्री मात्र स्थिर




पुण्यातील निवासी मालमत्ता बाजारपेठेत घरांची विक्री जवळपास स्थिर असली तरी ग्राहकांचा कल महागड्या घरांकडे झपाट्याने वाढत आहे. जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या नऊ महिन्यांत पुण्यात ३६ हजार ४०२ घरांची विक्री झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत ३६ हजार ४४७ घरांची विक्री झाली होती. म्हणजेच विक्रीत केवळ ४५ घरांची घट झाली आहे. मात्र, एक कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या घरांच्या विक्रीत तब्बल ३२ टक्क्यांची वाढ झाली आहे. नाइट फ्रँक इंडियाच्या अहवालानुसार, यंदा पुण्यात ४४ हजार ६७२ नवीन घरांचे लाँचिंग झाले. गेल्या वर्षाच्या तुलनेत त्यात ७ टक्के वाढ झाली आहे. देशातील आठ प्रमुख निवासी बाजारपेठांमध्ये घरांच्या विक्रीत पुण्याचा तिसरा क्रमांक असून, एकूण विक्रीत पुण्याचा वाटा १४ टक्के आहे. १ कोटींवरील घरांचा वाटा ३७% एक कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या घरांची विक्री १३ हजार ३७२ युनिट्सवर पोहोचली. त्यामुळे एकूण विक्रीतील या महागड्या घरांचा वाटा २८ टक्क्यांवरून थेट ३७ टक्क्यांवर गेला. एक ते दोन कोटी रुपयांच्या घरांची विक्री ३० टक्क्यांनी वाढून १० हजार ३३१ झाली. तर दोन ते पाच कोटी रुपयांच्या घरांची विक्री ३८ टक्क्यांनी वाढून २ हजार ८९७ युनिट्सवर पोहोचली. याउलट, ५० लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या घरांची विक्री २२ टक्क्यांनी घटून ७ हजार २१९ युनिट्स झाली. ५० लाख ते एक कोटी रुपयांचा विभाग १५ हजार ८११ घरांच्या विक्रीसह पुण्यातील सर्वांत मोठा किंमत विभाग ठरला. किमतीत ४ टक्के वाढ क्यू3 २०२६ मध्ये पुण्यातील निवासी घरांची भारित सरासरी किंमत ४ टक्क्यांनी वाढून १० हजार ६७ रुपये प्रति चौरस फूट झाली. मात्र, प्रमुख शहरांच्या तुलनेत पुणे अद्याप तुलनेने परवडणारे गृहबाजारपेठ असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. न विकलेल्या घरांचा साठा विक्रीस लागणारा कालावधी दर्शविणारा क्यूटीएस निर्देशांक ४.७ तिमाही राहिला. आठ प्रमुख शहरांची सरासरी ६.१ तिमाही असल्याने पुण्यातील जुन्या घरांच्या साठ्याचे शोषण तुलनेने वेगाने होत आहे. पूर्णत्वाच्या जवळ असलेल्या प्रकल्पांना ग्राहकांची पसंती मिळत असल्याचेही अहवालातून स्पष्ट झाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *