![]()
वाळकेश्वर येथील ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व असलेल्या बाणगंगा तलावातील मोठ्या प्रमाणातील मासे मृत झाल्याच्या पार्श्वभूमीवर कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सोमवारी बाणगंगा तलावाची पाहणी केली. दूषित पाण्यामुळे जलजीवनावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तलावाची स्वच्छता, पाण्याची गुणवत्ता आणि जलजीवांचे संरक्षण यासाठी महापालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना लोढा यांनी दिल्या. यावेळी महापालिकेच्या डी विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष साळुंखे तसेच स्थानिक नगरसेवक सन्नी सानप उपस्थित होते. तलाव परिसरातील सद्यस्थितीची पाहणी करून स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली. पितृपक्षाच्या काळात बाणगंगा तलाव परिसरात पिंडदानासह विविध धार्मिक विधी करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक येतात. या विधींमध्ये वापरले जाणारे तेल, तूप, गोड पदार्थ तसेच अन्य साहित्य तलावाच्या पाण्यात सोडले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होऊन जलजीवांना धोका निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी धार्मिक परंपरा जपत पर्यावरणपूरक पद्धतीने विधी करावेत, असे आवाहन लोढा यांनी केले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत वॉर्डमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बाणगंगा तलाव परिसरात स्वच्छता मोहीम राबविली होती. या मोहिमेनंतरही तलाव परिसरातील स्वच्छता सातत्याने कायम ठेवण्याच्या सूचना महापालिकेला देण्यात आल्या आहेत. गेल्या गुरुवारी महापालिकेच्या वॉर्ड अधिकाऱ्यांसोबत बाणगंगा तलाव परिसराची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली होती. पितृपक्षामुळे वाढणारी गर्दी लक्षात घेऊन तलावात धार्मिक साहित्य किंवा कचरा टाकला जाणार नाही, यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तलावातील जलजीवनाचे संरक्षण करण्यासाठी 10 कृत्रिम तलाव तयार करण्यात येणार असून, दूषित पाण्यात ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्यासाठी पंपांची संख्या वाढवण्यात येणार आहे. पितृपक्षाचा कालावधी येत्या शनिवारी संपणार असला तरी उर्वरित दिवसांमध्ये तलाव परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात तसेच त्यानंतरही स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजना सुरू ठेवण्याचे निर्देश लोढा यांनी दिले. पर्यावरणपूरक पिंडदानाचे आवाहन बाणगंगा तलावाला धार्मिक तसेच ऐतिहासिक महत्त्व असल्याने नागरिकांच्या श्रद्धेचा आदर राखत पर्यावरणाचेही संरक्षण करणे आवश्यक आहे. पिंडदानाच्या वेळी वापरण्यात येणारे पदार्थ तलावाच्या पाण्यात सोडल्यास ते जलजीवांकडून सेवन केले जाऊ शकतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी तलावात तेल, तूप, गोड पदार्थ किंवा अन्य पूजासाहित्य टाकणे टाळावे आणि पर्यावरणपूरक पद्धतीने धार्मिक विधी करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. “बाणगंगा तलावाला ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व आहे. आपल्या पूर्वजांचे स्मरण आणि धार्मिक परंपरा जपत असतानाच पर्यावरणाचे संवर्धन करणे हीदेखील आपली सामूहिक जबाबदारी आहे. तलावातील जलजीवनाचे संरक्षण व्हावे, यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. बाणगंगेचे पावित्र्य, स्वच्छता आणि पर्यावरण जपण्यासाठी सर्वांनी पर्यावरणपूरक पद्धतीने धार्मिक विधी करावेत,” असे मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. हेही वाचा… भाजप युवा मोर्चाची नवी टीम जाहीर:29 पदाधिकाऱ्यांची नियुक्ती, शंभवी साळेकडे युवती प्रमुखपदाची जबाबदारी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने युवा मोर्चाची नवी प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार युवा मोर्चाचे प्रभारी सुनील राणे आणि प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी 2026 साठीच्या नव्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. या कार्यकारिणीत एकूण 29 पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. सविस्तर वाचा…
Source link
बाणगंगेच्या सुरक्षेसाठी महापालिकेसोबत नागरिकांनीही सहकार्य करावे:मंगलप्रभात लोढांचे आवाहन बाणगंगा तलावाची केली पाहणी; 10 कृत्रिम तलावांची निर्मिती, ऑक्सिजन पंपांची संख्या वाढवणार